चोरी घरफोडीचे अनेक प्रकार उघड
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
सोलापूर : चोरीसहित अनेक गुन्ह्यात सहभागी असलेला, दोन राज्यातील पोलीस ज्या चोराचा शोध घेत होते आणि तरीही तो सातत्याने पोलिसांना गुंगारा देत होता अशा छन्या भोसले या गुन्हेगाराला अखेर जेरबंद करण्यात कामती पोलिसांना यश आले आहे.
छन्या भोसले यास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून ४७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे. चोरी, घरफोडी, जबरी चोरी असे अनेक गंभीर गुन्हे दाखल असणारा व सोलापूर ग्रामीण जिल्हयात तसेच कर्नाटक राज्यात या आरोपीचा शोध घेतला जात होता.
आरोपीकडे सखोल तपास केला असता कामती पोलीस ठाणे हद्दीत यापूर्वी घडलेल्या चोऱ्या, घरफोड्या या आरोपीने केल्या असल्याबाबत कबूली देऊन एकूण ४७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने काढून दिले. हा आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर मंगळवेढा पोलीस ठाण्याकडील गुन्हयात मोक्का अंतर्गत कारवाई सुरू आहे.
जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात चोरी, खून, दरोडा अशा विविध प्रकारच्या गुन्ह्यात हवा असणारा सराईत छन्या भोसले मागील काही वर्षांपासून गुन्हे करून तो पोलिसांना गुंगारा देत होता. कामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याने पोलिसांचे पथक त्याच्या शोधात होते.
काही दिवसांपूर्वीच आरोपी जामगाव (ता.मोहोळ) येथे आल्याचे समजताच कामती पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक उदार, हवालदार सर्जेराव बोबडे, सचिन जाधवर, हरीश थोरात, राहुल दोरकर, अनुप दळवी, निशिकांत येळे हे तेथे जाऊन शिताफीने त्याला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून दांड पट्टा, सुरा ही हत्यारं जप्त करण्यात आली. ही कामगिरी कामती पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार यांच्या पथकाने बजावली.
