महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
बार्शी : बार्शी येथील लायन्स क्लब बार्शी टाउन तेजस्विनी या महिलांच्या क्लबने सुविधा आय. सी.यु.अँड कॅथ लॅब सेंटर येथे डायलिसिस मशीन प्रदान करून रुग्णांना मोफत डायलीसिसची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
प्रांत ३२३४ डी १ चे प्रांतपाल भोजराज नाईक निंबाळकर व प्रथम उपप्रांतपाल एम. के. पाटील यांच्या हस्ते या सुविधेचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी झोन चेअरमन प्रकाश फुरडे, डॉ.अजित आव्हाड, डॉ. सचिन बोटे, सुविधा हॉस्पिटलचे संचालक नितीन आवटे आणि किरण आवटे, लायन्स टाऊनचे अध्यक्ष डॉ. योगेश कुलकर्णी हे उपस्थित होते.
प्रांतपाल भोजराज नाईक निंबाळकर यांनी महिलांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल क्लबच्या सर्व सदस्यांचे कौतुक केले. प्रांतामध्ये हा महिलांचा पहिला आणि एकमेव क्लब आहे की, ज्या क्लबने रुग्णांकरिता डायलिसीसची सुविधा व तीही पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
उपप्रांतपाल एम.के. पाटील यांनीही महिलांची ही कामगिरी अतिशय स्तुत्य व समाजोपयोगी असल्याचे सांगून क्लब मधील सर्व सदस्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. डॉ. अजित आव्हाड यांनी आजपर्यंत सुविधा हॉस्पिटलने २२,००० रुग्णांचे डायलिसिस यशस्वीरित्या केल्याचे, तसेच मागील ३ वर्षात यातील १२,००० डायलिसिस केल्याचे सांगितले. त्यामुळे वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता या मशीनचा फायदा गरजू व गरीब रुग्णांकरता होईल असे आवर्जून सांगितले.
सध्या डायलिसिस हे फक्त किडनी आजाराच्या पेशंटकरता नसून, इतर आजाराकरिता सुद्धा गरजेचे असते याची माहिती त्यांनी दिली. लायन्स क्लब तेजस्विनी मागील अनेक वर्षापासून मैत्री फेस्टिवल हा कार्यक्रम आयोजित करीत आहे. या कार्यक्रमांमध्ये महिलां साठी विविध स्पर्धांचे आयोजन करून एक व्यासपीठ निर्माण करून दिले जाते.
यामधून जो निधी उपलब्ध होतो तो निधी अशा समाजोपयोगी कार्यासाठी वापरला जातो आणि या वर्षीच्या मैत्री फेस्टिवल मधून जो निधी उपलब्ध झाला तो यावर्षीचे अध्यक्ष अर्चना आवटे, सचिव जयश्री ढगे, खजिनदार सोनाली कसपटे व प्रकल्प प्रमुख शितल परमार व सर्व सदस्य यांनी मोफत डायलिसिस सेंटर या उपक्रमासाठी वापरला. यामुळे नक्कीच समाजातील अनेक गरीब व गरजू रुग्णांना याचा फायदा होईल.
क्लबचे अध्यक्ष अर्चना आवटे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे आभार प्रकल्प प्रमुख शीतल परमार यांनी मानले. सूत्रसंचालन शर्वरी फुरडे यांनी केले. याप्रसंगी बार्शी टाउनचे सदस्य निलेश परमार, वासुदेव ढगे, अतुल सोनीग्रा, प्रवीण कसपटे व सर्व सदस्य आणि मैत्री फेस्टिवलसाठी सहकार्य लाभलेले निलेश सरवदे, संतोष शहा, शशांक गुगळे हे उपस्थित होते.
