महिलेला तडीपार करण्याची अलीकडच्या काळातील पहिली घटना
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
सोलापूर : परिसरातील रहिवाशांमध्ये दहशत व असुरक्षितेची भावना निर्माण केल्याने सराईत गुन्हे करणारी गुन्हेगार शमा इब्राहिम शेख (वय ४३ वर्षे) या महिलेस सोलापुरातून तडीपार करण्यात आले आहे. महिलेची तडीपारी करण्याची अलीकडच्या काळातील पहिली घटना मानली जात आहे.
या महिलेच्या कृत्यामुळे रहिवाशी व व्यवसायिक यांना हानी पोचत असून सदर महिलेबद्दल त्यांच्या मनात भीती निर्माण झालेली आहे. परिसरात राहणाऱ्या मुली व महिलांच्या जिवीतास धोका उत्पन्न झाला आहे.
तसेच आगामी काळात विविध जाती-धर्माचे सण-उत्सव, मिरवणुका व लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर शहर व परिसरात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, म्हणून शहरात कायदा व सुव्यवस्था तसेच शांतता अबाधित राहण्याच्या उद्देशाने सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत विजापूर नाका पोलीस ठाणे व सोलापूर ग्रामीण हद्दीतील सोलापुर तालुका पोलीस ठाणे हद्दीत सराईत गुन्हे करणारी गुन्हेगार शमा इब्राहिम शेख म्हणून कुप्रसिद्ध आहे.
तिच्याविरुध्द गंभीर स्वरूपाचे एकुण २ गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे तिला सोलापूर शहर व उर्वरित सोलापुर जिल्हा व उस्मानाबाद जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता तडीपार करण्यात आले आहे. तिला तडीपार केल्यानंतर हगलूर (ता. आळंद जि. गुलबर्गा, राज्य कर्नाटक) येथे सोडण्यात आलेले आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त (परिमंडळ) विजय कबाडे, सहा. पोलीस आयुक्त (विभाग ०२) अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड, पोलीस निरीक्षक संगीता पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार गायकवाड यांनी केली आहे.

















