कात्रजमधील घटना : दुचाकीस्वार दुचाकीसह थेट खोल दरीत
पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
भरधाव वेगात जाणाऱ्या मिक्सर ग्राइंडरची दुचाकीस्वाराला धडक बसल्याने दुचाकीस्वार थेट ४० फूट दरीत कोसळला. ही घटना आज (सोमवार) सकाळी अकराच्या सुमारास कात्रजच्या जुन्या घाटात घडली आहे.
अलिम मुजावर असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव असून, त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी सांगितले की, सोमवारी सकाळी अकरा वाजता मिक्सर ग्राइंडर कात्रज जुन्या घाटातून पुण्याकडे येत होता. मात्र, घाटामध्ये ब्रेक निकामी झाल्यामुळे पुढे चाललेल्या दुचाकीला त्याची धडक बसली. या अपघातामध्ये दुचाकीस्वार थेट 40 फूट खोल दरीत कोसळला. दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत झाली असून, दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.
अपघाताची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस आणि कात्रज अग्निशमन केंद्रातील जवान, चालक अनंता जागडे, फायरमन रमेश मांगडे, तेजस मांडवकर, शिवदास खुटवड, देवदूत चालक रुपेश जांभळे फायरमन शुभम शिर्के, निलेश तागुंदे, मंदार, राजेंद्र भिलारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दरीत कोसळलेल्या दुचाकीस्वारास बाहेर काढून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस करीत आहेत.
