संशयितरीत्या फिरणाऱ्या तरुणाला अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
बार्शी : बार्शी-लातूर रोडवर एका टीव्ही शोरूमसमोर संशयितरीत्या फिरणाऱ्या तरुणाला पकडून झडतीत एक गावठी बनावटीचे पिस्टल आणि दोन राउंड जप्त केले.
आकाश गाडे (वय २७, रा. सिंहगड, पुणे सध्या रा. माणकेश्वर, ता. भूम), असे संशयितरीत्या फिरताना पकडलेल्या तरुणाचे नाव आहे. ही कारवाई २१ मे रोजी पोलिसांनी केली. याबाबत पोलिस कॉन्स्टेबल अंकुश जाधव यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सहायक पोलिस निरीक्षक दिलीप ढेरे, पोलिस कॉन्स्टेबल वैभव भांगे, पोलिस कॉन्स्टेबल प्रल्हाद आकुल वार, कॉन्स्टेबल सचिन नितनात हे गस्त घालत लातूर रोडवर झाडबुके महाविद्यालयासमोर येताच तेथे आरोपी हा संशयितरीत्या थांबलेला दिसला. पोलिसांना पाहताच तो पळून जात असताना त्याला पकडले.
त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ परवाना नसलेले पिस्टल व खिशात दोन राउंड, मोबाइल मिळाले. ते जप्त करण्यात आले. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक दिलीप ढेरे करीत आहेत.















