बार्शी सत्र न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
बार्शी : प्रेयसीच्या आत्महत्येप्रकरणी प्रियकराची (शौकत इसाक मुलाणी) याची मुक्तता करण्याचा निकाल बार्शीच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधिश र.म. कुलकर्णी यांनी दिला आहे. आरोपीतर्फे अॅङ प्रशांत शेटे यांनी काम पाहिले.
गोरीबाई पठाण, (रा. मुंबई) हिने बार्शी पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली होती की, तिच्या मुलीची मुलगी नसिम शेख (रा. बार्शी येथील ४२२, गाडेगांव रोड, बार्शी) येथे तिच्या आई वडिलांसोबत राहत होती. तिचा निकाह समीर शेख याच्या बरोबर झाला होता. नसीम ला दोन मुले होती.
नसीमचे तिच्या नवऱ्याबरोबर पटत नसल्याने ती अधुन मधुन गोरीबाईकडे मुंबई येथे राहत असे. एके दिवशी गोरीबाईला नसीमचा फोन आला की, तिला शौकत मुलाणी (रा. ख्वाजा नगर, ४२२ बार्शी) हा वारंवार त्रास देत असून त्याच्याशी संबंध ठेवले नाही तर वडील गफार व दोन मुले रिहान व जियान यांना मारुन टाकीन अशी धमकी तो देत होता.
आरोपी सोबत ती मुंबईला येत जात होती. त्यामुळे तिला तिचे जीवन नकोसे झाले, त्याच टेन्शनमध्ये नसीम हिने दुपारी २.०० वाजण्याच्या सुमारास तिच्या राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने पत्र्याच्या अँगलला गळफास घेतला. अशी तक्रार दिल्यानंतर बार्शी पोलिस स्टेशन येथे शौकत मुलाणी याच्यावर गुन्हा दाखल होऊन आरोपीस अटक करण्यात आली.
या प्रकरणी अत्यंत नाटयमय साक्षी झाल्या. सरकार पक्षातर्फे गोरीबाई पठाण, गफार शेख, तपास अधिकारी पोलीस उपनिरिक्षक प्रतिभा ठाकूर यांच्या साक्षी घेण्यात आल्या. या साक्षीदारांच्या उलट तपासातून जेम्स भाभी या महिलेशी सावकारी आर्थिक व्यवहारातून नसीमचे भांडण झाल्याचे समोर आले.
एकंदरीतच सरकार पक्ष आत्महत्येस प्रवृत्त करुन नसीम हिच्या मृत्यूस कारणीभुत ठरल्याचा आरोप सिद्ध करु शकला नाही तसेच आरोपीचे वकील अॅड. प्रशांत शेटे यांचा युक्तीवाद ग्राह्य मानुन बार्शीच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश र.म. कुलकर्णी यांनी आरोपीची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले आहेत. आरोपीतर्फे अॅड. प्रशांत शेटे, अॅङ संकेत लकशेट्टी, अॅङ रोहन स्वामी यांनी काम पाहिले.
