व्यापारी एकता दिनानिमित ८५ वर्षांच्या तरूणाची कामगिरी
महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल
पुणे : स्वतःच्या हाताने तब्बल ७६ लाख शब्द लिहिण्यासाठी वर्ल्ड वाईल्ड बुक रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या 85 वर्षांच्या भगवानदास सुगंधी (दर्डा) यांनी व्यापारी एकता दिनानिमित दि पूना मर्चंट्स चेंबरमध्ये सलग १५ तास ‘नवकार मंत्र’ लिहिण्याचा विक्रम केला.
या उपक्रमाची सुरुवात सकाळी ७.०० वाजता चेंबरचे अध्यक्ष रायकुमार नहार व राजेंद्र बाठिया यांच्या सहीने झाली. हा कार्यक्रम दि पूना मर्चट चेंबरचे अध्यक्ष रायकुमार नहार, सचिव ईश्वर नहार, सहसचिव आशिष दुगड, माजी अध्यक्ष राजेंद्र बाठीया, प्रविण चोरबेले व चेंबरचे कार्यकारिणी सदस्य यांच्या उपस्थितीत पार पडला.
आजपर्यंत भगवानदास सुगंधी (दर्डा) यांनी लिखाणाच्या आवडीमुळे सुवाच्य अक्षरात ७०४९ पाने लिहून पूर्ण केली आहेत. त्यासाठी २४ वह्या वापरल्या आहेत. यासाठी त्यांना त्यांचे मित्र दिवाकर हेजीब यांचे सहाय्य लाभले.
याप्रसंगी बोलताना चेंबरचे अध्यक्ष रायकुमार नहार म्हणाले, “आम्ही चेंबरचे भाग्य समजतो की, सुगंधी (दर्डा) हे पुण्यकाम व्यापारी एकता दिनाचे औचित्य साधून चेंबरच्या वास्तूमध्ये करीत आहेत. त्यांनी सकाळी ७ ते रात्री १० पर्यंत सलग १५ तास नवकार मंत्र लिहिण्याच्या विक्रमास सुरुवात केली आहे. मितिस त्यांचे वय ८५ वर्ष असून तरूणांना लाजवेल असा त्यांचा उत्साह आहे.”
या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दिपक मानकर, पुणे महानगर संघचालक यांच्या पत्नी वंजार वाडकर, पदमविभूषण डॉ. के. एच. संचेती, सिद्धीविनायक ग्रुपचे राजेश सांकला, उल्हास त्रिमल, आयकर आयुःत, एस. के. जैन, पुनित जोशी, पुणे शहर
महामंत्री भा.ज.पा. प्रभाकर मोहोळ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रांत भारतीय विचार साधना प्रमुख अभय थिटे, गृहमंत्रालय भारत सरकारचे वरिष्ठ सलाहकार अमर मुल्ला या मान्यवरांनी भेट दिली.
अत्यंत मंगलमय वातावरणात सुगंधी (दर्डा) यांनी सकाळी ठीक सात वाजता लिहण्यास सुरुवात केली.
ज्या वयात लिहिताना हात थरथर कापतो, त्या वयात अतिशय सुंदर हस्ताक्षर काढून सुगंधी (दर्डा) यांनी ही किमया करून दाखविली.भगवानदास सुगंधी (दर्डा) यांनी या वयात २४ रजिस्टर स्वतःच्या हाताने लिहून पूर्ण केली. त्यामध्ये जैन धर्माचे मंत्र, भगवद् – गीता, परमेश्वराचे नाव आदी लिखाण आहे.
याच लेखनाची दखल २०२३ मध्ये वर्ल्ड वाईल्ड बुक रेकॉर्डने घेतली आणि त्याचे नाव रेकॉर्डमध्ये नोंदविण्यात आले. भगवानदास सुगंधी (दर्डा) यांच्या धुमधडाका अगरबत्तीचा व्यवसाय १९१३ साली पुणे, गणेश पेठ येथे सुरू झाला. आज त्यास १११ वर्षे पूर्ण झाली आहेत.
अत्यंत खडतर व प्रतिकुल परिस्थितीत त्यांनी हा व्यवसाय गणेशपेठेत नावारूपाला आणला. त्यासाठी त्यांना त्यांच्या पत्नी कमलाबाई, कन्या सुमिता, शोभा व बाला तसेच सुपुत्र गिरीश व सून शिल्पा नातू दर्शन यांचे सहकार्य लाभले. त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांनी एकूण १०८ प्रॉडक्ट स्वतः तयार केले आहे. त्यामध्ये मुख्यतः उदबत्ती, धूप, पूजा सामुग्री व अत्तर तयार करण्यासाठी त्यांचे स्वतःचे प्रॉडक्शन युनिट आहे.
१९८३ साली त्यांनी सामाजिक ट्रस्टची स्थापना केली आणि ट्रस्टतर्फे समाजासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबविले. त्यांना वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, एलाईट बुक ऑफ रेकॉर्ड यांच्याकडून गोल्ड मेडेल मिळाले आहे. कोल्हापूरचे जगतगुरू शंकराचार्य यांनी त्यांना प्रमाणपत्र व दि पूना मर्चट चेंबरतर्फे त्यांना यापूर्वीच नामांकित ‘आदर्श व्यापारी उत्तम पुरस्कार’ देवून गौरविण्यात आले आहे, अशी माहिती दि पुना मर्चंटस् चेंबरचे अध्यक्ष रायकुमार नहार यांनी दिली.
