महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
कुर्डुवाडी : एका लिंकवर क्लिक केल्याने बँक खाते हॅक होऊन कुर्डुवाडी शहरातील अनेक व्यापारी वर्गाच्या बँक खात्यातील लाखो रुपये लंपास झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
कुर्डुवाडी शहरातील अनेक व्यापाऱ्यांना स्टेट बँक ऑफ इंडिया या नावाने त्यांच्या ग्रुपवर अथवा पर्सनल व्हॉट्सअॅप लिंक येत होती. या लिंकवर काही जणांनी क्लिक करताच त्यांचा व्हॉट्सअॅप नंबर हॅक केला गेला.
त्यानंतर थोड्याच वेळात स्टेट बँक ऑफ इंडियासह विविध बँकेतील सर्व रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर करून काढून घेतली गेली. सोमवार, दि.२७ मे रोजी रात्री ८ वाजल्या पासून ते दि.२८ मे दरम्यान हा प्रकार घडला. याबाबत जयेश अशोककुमार बजानिया यांनी कुर्डुवाडी पोलिसात लेखी तक्रार दिली आहे.
यात त्यांच्या स्टेट बँक ऑफ इंडिया सह विविध बँकेतील सुमारे दोन लाखाची रोकड गायब झाल्याचे म्हटले आहे. असाच प्रकार अनेकांबाबत घडल्याची चर्चा सुरु होती. मंदार शहा यांनी ही त्यांच्या मोबाईलचे व्हॉटस्अॅप हॅक झाल्याची तक्रार पोलिसात दिली आहे. तर अनेकांनी सायबर शाखेकडे ऑनलाईन तक्रार केली आहे.
याबाबत स्टेट बँक ऑफ इंडियाचे कुर्डुवाडी ब्राँच मॅनेजर अविनाश वाघमारे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सदर प्रकरण वरिष्ठांना कळवल्याचे सांगितले तर या प्रकरणात बँकेकडून तक्रार झाली नसल्याने गुन्हा नोंद झाला नाही, असे पोलिसांनी सांगितले.
कुर्डुवाडी पोलिसांकडून सतर्क राहण्याचे आवाहन
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नावाने आपल्या मोबाईलमध्ये ग्रुप तयार होतो. किंवा त्याचा पर्सनल मेसेज येतो, त्या लिंकवर चुकून क्लिक झाले तर तुमचे खाते रिकामे होऊ शकते. अनेक पोलीस स्टेशनकडे याबाबत तक्रार येऊ लागल्या आहेत. आपण अशा लिंकवर क्लिक करू नका, असे ग्रुप डिलीट करा किंवा मेसेज डिलीट करा. हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा, असे आवाहन पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांनी केले आहे.
