महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
आमचे बार्शी म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण. मराठवाड्याचे प्रवेशद्वार अशी त्याची ओळख. शिक्षण, क्रीडा, वैद्यकीय, औद्योगिक, सांस्कृतिक दृष्टीने समृद्ध शहर. या शहरातील सुलाखे हायस्कूल म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेली एक समृद्ध शाळा. चौथीपर्यंत नवीन मराठी शाळा आणि पुढे पाचवीपासून सुलाखे हायस्कूल आणि पुढे जाऊन जगदाळे मामानी स्थापन केलेले शिवाजी महाविद्यालय असा आम्हा बार्शीकर मित्रमंडळींचा सर्वसाधारण शालेय प्रवास. अनेक मित्रमंडळींचे चेहरे नजरेसमोर येत होते. सोबतच नवीन मराठीचे गोवर्धन सर, गाडे सर, चोपडे सर, कवठाळे सर, सुलाखे हायस्कूलचे तत्कालीन मुख्याध्यापक कार्यकर्ते सर, दिवटे सर, गोडबोले सर, नलगे सर, व्ही एस कुलकर्णी सर वागदरीकर मॅडम, गोडबोले मॅडम, गोवर्धन मॅडम, डी आर देशपांडे सर असे आमचे गुरुवर्य त्यांच्या आठवणी देखील मनामध्ये येत होत्या. अखेर 2 जून ची तारीख आली. स्नेह मिळाव्याला एक एक जण जमत अतिशय अल्प कालावधीमध्ये स्नेहमेळावा ठरल्याने फार मोठ्या उपस्थितीची अपेक्षा नव्हती. पण एक .. एक जण येत गेला संपूर्ण हॉल भरून गेला. मात्र अतिशय अल्प कालावधी हा स्नेह मिळावा ठरल्यामुळे कोणत्याही मुलीला निमंत्रण गेले नव्हते फक्त मुलांचेच हे गेट-टुगेदर चालू झालं होतं. ठराविक वेळेपेक्षा उशिरा येणाऱ्यांना अंगठे धरून उभे राहणे, उठाबशा काढणे काढणे अशा त्यावेळी शाळेत झालेल्या शिक्षा देखील झाल्या आणि हळूहळू 34 वर्षापूर्वीच्या आठवणींमध्ये आम्ही सर्वजण बुडून गेलो.
…. आम्ही जेव्हा पहिलीला होतो म्हणजे 1981 साली. नवीन मराठी शाळा तुळशीराम रस्त्यावर गावामध्ये भरायची. तिथून दुसरीला आम्ही नवीन मराठी शाळेच्या बार्शी शहरा बाहेरच्या सुलाखे हायस्कूलचे शेजारी असलेल्या इमारतीमध्ये शिफ्ट झालो. ही नवीन इमारत मोठ्या मोकळ्या जागेमध्ये होती. शाळेसमोर समोर भले मोठे मैदान. मधल्या सुट्टीमध्ये आणि शाळा भरण्यापूर्वी आणि नंतर मुला-मुलींनी हे मैदान भरून गेलेले असायचे. आमच्या सगळ्या कवायती, खेळ याच मैदानावर व्हायच्या. मधली सुट्टी पावणेतीन ते साडेतीन अशी 45 मिनिटांची असायची. आम्ही मुले मैदानावर डबे उघडून झाडाखाली जागा मिळेल तिथे बसायचो. 45 मिनिटांची ही पूर्ण सुट्टी जेवणाची सुट्टी असल्यामुळे संपूर्ण 45 मिनिटे जेवणासाठीच वापरले पाहिजेत असा माझा सुरुवातीचा समज होता. त्यामुळे सुट्टी होताच हात धुवून जेवायला बसलो की पूर्ण 45 मिनिटे माझा जेवणाचा कार्यक्रम चालायचा. अज्या देशपांडे, चंध्या कुलकर्णी, सल्ल्या शेख अभ्या जोशी, रम्या सोमानी हा आमचा जेवायचं ग्रुप होता. बाकीचे दहा-पंधरा मिनिटात जेवण आटोपून उरलेला वेळ शिवाशिवी, पळापळी, गलोर असलं काहीतरी खेळत बसायचे. संपूर्ण मधली सुट्टी मी जेवत बसत असल्याने मला खेळायला काही मिळायचे नाही.
नवीन मराठी शाळेतले आमचे सगळेच सवंगडी प्रचंड मस्तीखोर होते. त्यामुळे शिक्षकांचे मार खायचा प्रमाणही अतिप्रचंड होते. वर्गामध्ये अंगठे धरून उभे राहणे, हातावर पट्टीने मार पडणे या अतिशय सर्वसाधारण घटना होत्या. पण मनापासून विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या आमच्या शिक्षकांमुळे आज आमचे सर्व सवंगडी आपापल्या क्षेत्रातील दिग्गज आहेत.
…. पुढे पाचवीला आम्ही सुलाखे हायस्कूलच्या इमारतीमध्ये शिफ्ट झालो. आमच्या शाळेची घंटा इमारतीची समोरच्या बाजूला होती किसन, वाघ, बुवा हे त्यावेळचे शिपाई ठरलेल्या वेळी घंटा वाजवायचे. त्यांनी घंटा वाजविल्याशिवाय शाळा सुटत नसे, भरत नसे. त्यामुळे मला त्यांच्याविषयी प्रचंड आदर आणि भीती वाटे. माझ्या वर्गात येणारे, जाणारे शिक्षक त्यांनी वाजवल्या घंटे भरहुकूम वर्गात येत जात असत. घंटा झाली की कोणत्याही विद्यार्थ्याला वर्गाबाहेर थांबता येत नसे. त्यामुळे घंटा वाजविणारे कर्मचारी हे शाळेतले सर्वोच्च अधिकारी आहेत, असा माझा तेव्हा ठाम समज होता. अतिशय प्रामाणिकपणे शाळेची सर्व कामे करणाऱ्या या सर्वांचा मला आजही मनापासून आदर वाटतो.विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या मित्र मैत्रिणींची नव्याने ओळख होत होती.
आता जुन्या आठवर्णीना मोठाच बहर आला होता. हास्यकल्लोळ वाढत चालला होता. मधल्या काळात सोशल मीडियावर फोटो सुरू होताच अनेक मुलांचे मुलींचे फोन सुरू झाले. एवढ्या कमी कालावधीत गेट-टुगेदर भरवल्याने अनेक जण येऊ न शकल्याने नाराजी व्यक्त करत होते. लवकरच योग्य तारीख ठरवून जास्तीत जास्त संख्येने गेट-टुगेदर भरवायचंच याचे प्लान देखील बनु लागले. शुद्ध शाकाहारी जेवणाचा आस्वाद घेत बोलणे गप्पागोष्टी करत आनंद व्यक्त होत होता.
जेवणानंतर लगेचच संतोष कांबळे, डॉक्टर रणजीत काकडेंनी भारदार आवाजामध्ये हिंदी गाण्यांची मैफिल सुरू केली. ऍड. अतुल पाटलांनी त्याला उत्कृष्ट साथ दिली. वातावरणाचा अंदाज घेत सलीम शेख ने जबरदस्त डान्स परफॉर्मन्स सादर केला केला. आता सांस्कृतिक महोत्सव जनु भरला. अजय कुलथे, नरेंद्र कुलकर्णी, शशी कुणके, डॉक्टर दीपक जगताप सगळेच मैदानात उतरले आणि मराठी हिंदी गाण्यावर संपूर्ण हॉल थिरकायला सुरु झाला. ……. आता कोणी डॉक्टर नव्हते, कोणी इंजिनियर नव्हता, कोणी उच्चपदस्थ नव्हते…… सगळे होते 1990 च्या बॅचचे सवंगडी…… (-अविनाश सोलवट, उपमुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव)
…..मागच्या आठवड्यात अजित देशपांडे चा बार्शी वरून फोन आला. मी मंत्रालयातल्या सातव्या मजल्यावरच्या उपमुख्यमंत्री कार्यालयातल्या माझ्या केबिनमध्ये दैनंदिन प्रशासकीय कामकाज पाहत होतो… ‘आव्या, दोन तारखेला बार्शीला यायचे प्लॅनिंग कर, आपल्या 1990 च्या दहावीच्या बॅचचा स्नेहमेळावा आयोजित करायचे ठरलेय.’ 1990 ची सुलाखे हायस्कूल, बार्शी या शाळेची आमची दहावीची बॅच. एवढ्या वर्षानंतर आपले मित्र भेटतील म्हणून मी खुश झालो. तीन तारखेला बार्शीला जायचं पक्क केलं.
मोकळ्या मैदानात आम्ही जेवायला बसलो कि मोठ्या संख्येने घारी नावाचे उंच आकाशात उडणारे पक्षी गिरट्या घालायचे. कावळे, चिमण्या सारखे पक्षी देखील आजूबाजूला असायचे. मला आठवतंय एकदा आमचे सगळ्यांचे जेवण झाल्यानंतर एक घार अचानक आमच्या जवळ आली आणि आज्या देशपांडे चा पूर्ण डबाच हवेत उचलून आकाशात उंच घेऊन गेली. आज्या ने जेव्हा हे घरी सांगितलं तेव्हा त्याच्या आईने काही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही . त्याच्या आईला वाटलं हा डबा विसरून आला आणि खोटं सांगतोय. तू खरच बोलतोय हे सांगायला आम्हाला त्याच्या घरी जावं लागलं.
अनेक मित्रांचे जागतिक दर्जाचे व्यवसाय आज आहेत. कधीकाळी कॉप्यांचे अनेक नव नवीन प्रकार शोधत कसाबसा शाळेत पास झालेला आमचा मित्र प्रितेश मेहता अनुभवाच्या, चिकाटीच्या आणि व्यावसायिक कौशल्याच्या आधारावर आज जास्तीचा टर्नओव्हर करणाऱ्या कंपनीचा मालक बनला आहे. शाळेमध्ये अतिशय शांत, संयमी असलेला दीपक जगताप आज हजारो डिलिव्हरी करणाऱ्या दवाखान्याचा प्रमुख म्हणून या सर्व परिसरातला प्रचंड नावाजलेला गायनॅकॉलॉजिस्ट आहे. डॉ. अमोल सुराणा डॉ. लोंढे, डॉ. रणजीत काकडे हे दिगज डॉक्टर आमचे बाल सवंगडी असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. संदीप जाधव, रणजीत सावळे, सचिन बुडूक, चंदन हवेली, मुकुंद मुंदडा, बिपिन निलंगे, विजय कुलकर्णी, अजय देशमुख, गिरीश झंवर, अमर नलावडे, जयंत देशमुख सलीम शेख या सर्वांनी आपापल्या क्षेत्रामध्ये नावाचा आणि व्यवसायिक कंपनीचा दबदबा निर्माण केला आहे. आमचा योगेश गोडबोले आज गोकुळ दूध संघाचा एमडी आहे. घनश्याम अडसूळ, विश्वेकर यासारखे असंख्य अधिकारी आपापल्या विभागामध्ये उच्चपदस्थ आहेत. 40 व्या वर्षी डॉक्टरेट मिळविणारा महेश हुबळीकर, श्रीकांत कुंभारे शिक्षण क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावत आहेत.
