महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : राज्याचे अर्थमंत्री आणि पुणे जिल्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प जाहीर केला. त्यामध्ये त्यांनी पुणे जिल्ह्यासाठी खास लक्ष्य दिल्याचे दिसत आहे.
१) पुण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शहरात मेट्रोचे जाळे उभारण्यात येत आहे. मेट्रोसाठी विशेष तरतूद केली आहे. मेट्रो मार्गांची लांबी वाढविण्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. २) पुण्यातील तीन किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा नामांकनासाठी शिवकालीन १२ किल्ल्यांचा युनेस्कोकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.
त्यामध्ये पुण्यातील शिवनेरी, लोहगड, राजगड या किल्ल्यांचा समावेश आहे. पुण्यातील गणेशोत्सव जगभर प्रसिद्ध आहे. या गणेशोत्सवासाठी ही विशेष तरतूद असणार आहे. ३) ५१ हजार ३९३ विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यातून ५२ हजार ४०५ विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळणार आहे.
४) अवसरी खुर्द, पुणे येथील तंत्रशिक्षण संस्थांमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यास मान्यता दिली असून, त्यामुळे तंत्रशिक्षणामध्ये अधिक गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यास मदत होईल. ५) स्वच्छ व हरित ऊर्जेचे ध्येय साध्य करण्यासाठी जनाई-शिरसाई, पुरंदर यासह सर्व शासकीय उपसा जलसिंचन योजनांचे सौर ऊर्जीकरण करण्यासाठी ४ हजार २०० कोटी रुपये खर्चाची तरतूद केली आहे.
त्यामुळे या योजना पूर्ण क्षमतेने कार्यरत राहणार आहेत. ६) बी.जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बहुउद्देशीय सभागृह बांधण्यासाठी राज्याकडून निधी देण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. या निधीतून येथे आधीपासूनच असलेल्या महात्मा गांधी सभागृहाचे नूतनीकरण केले जाणार आहे.















