२८ फेब्रुवारी ते १ मार्चदरम्यान ४० भोंगे जप्त
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : बार्शी शहर पोलीस ठाणे हद्दीत दि. २८ फेब्रुवारी २०२६ ते दि. १ मार्च २०२६ या कालावधीत धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंग्यांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात आली. ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण ठेवणे, मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करणे तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली.
अलीकडे शहरात घडलेल्या घटनेनंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्या पार्श्वभूमीवर शांतता समितीच्या बैठकीत सर्व धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंगे काढण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार ही विशेष मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेदरम्यान एकूण १० मस्जिदींची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४ मस्जिदींवरील १० भोंगे काढण्यात आले. तसेच ११ मंदिर व धार्मिक मठांची तपासणी करून ८ भोंगे उतरविण्यात आले. २८ फेब्रुवारी ते १ मार्चदरम्यान एकूण ४० अनधिकृत भोंगे काढण्यात आले असून शहरात ध्वनीप्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.
सदर कारवाई सोलापूर ग्रामीण चे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
बार्शी शहर पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी मोहिमेचे नेतृत्व केले. त्यांच्या समवेत सपोनि समीर ढोरे, पोउनि महेश गळगटे, पोउनि उमाकांत कुंजीर, महिला पोलीस उपनिरीक्षक सोनम जगताप, पोउनि धन्नप्पा शेटे, सपोफौ अजित वरपे यांच्यासह पोलीस कर्मचारी पोहेकॉ विश्वजीत ठोंगे, पोकॉ अंकुश जाधव, सतीश उघडे, इसामिया बहिरे, बशीर मुलाणी, कादर तांबोळी, सचिन देशमुख, अजीस शेख, लतीफ मुजावर, मपोकॉ. अश्विनी साबळे तसेच इतर कर्मचारी यांनी कारवाईत सक्रिय सहभाग घेतला.
कारवाईदरम्यान संबंधित धार्मिक स्थळांच्या ट्रस्टींना ध्वनीप्रदूषण प्रतिबंधक नियम व अटींची माहिती देण्यात आली. कायदेशीर परवाना घेऊनच स्पीकरचा वापर करावा, आवाजाची निर्धारित मर्यादा पाळावी आणि स्पीकर बॉक्स धार्मिक स्थळाच्या आतील भागात बसवावा, अशा सूचना देण्यात आल्या.
धार्मिक स्थळांच्या ट्रस्टींना विश्वासात घेऊन ही कारवाई करण्यात आली असून सध्या हद्दीत शांततेचे वातावरण आहे. उर्वरित अनधिकृत भोंगे काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.
















