डिजिटल अरेस्टची भीती दाखवून ज्येष्ठ नागरिकांची पावणे अकरा कोटींची फसवणूक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : डिजिटल अरेस्टची भीती दाखवून शहरातील एका ज्येष्ठ नागरिकाची पावणे अकरा कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर चोरट्यांना सायबर गुन्हे शाखेने अटक केली.
हर्षद सुभाष धनतोले (वय २३) आणि समर्थ सुरेश देशमुख (वय २४, दोघे सध्या रा. कर्वेनगर, मूळ रा. छत्रपती संभाजीनगर) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. आरोपी धनतोले आणि देशमुख यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागातील (सीबीआय) अधिकारी असल्याची बतावणी केली होती.
काळ्या पैशांच्या व्यवहारात बँक खात्याचा वापर करण्यात आला असून, या प्रकरणात सीबीआयकडून अटक (डिजिटल अरेस्ट) करण्यात येणार असल्याची भीती दाखविण्यात आली होती. या प्रकरणात कुटुंबीयांनाही अटक करण्यात येणार असल्याचे सांगून आरोपींनी ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना तातडीने चोरट्यांनी दिलेल्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यास सांगितले.
त्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने चोरट्यांच्या खात्यात १० कोटी ७४ हजार रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपींच्या खात्यातील ४० लाख रुपयांची रक्कम गोठविण्यात आली आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, पोलीस निरीक्षक संगीता देवकाते, सहायक निरीक्षक अर्चना कटके, पोलीस उपनिरीक्षक सुशील डमरे, अजित बढे, पोलीस अंमलदार कृष्णकांत देसाई, रवींद्र साळवी, पोलीस हवालदार जान्हवी भडेकर, गंगाधर काळे, नवनाथ कोंडे, चव्हाण, राजपूत, रामाने, सचिन शिंदे, विजय भोसले, लोकेश्वरी कटके, अदनान शेख, भांडलकर, मांढरे, मारकड, किरण गायकवाड आणि सुप्रिया होळकर यांनी केली.
पोलिसांनी तपास सुरू केला. ज्येष्ठ नागरिकाने ज्या बँक खात्यात पैसे भरले होते, त्या खात्याची तांत्रिक तपासणी करण्यात आली. तसेच चोरट्यांनी शहरातील काही एटीएममधून पैसे काढले होते. पोलिसांनी संबंधित एटीएममधील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. सायबर पोलिसांच्या पथकाने तपास करून आरोपी धनतोले आणि देशमुख यांना अटक केली. त्यांच्याकडून चार लाख ७८ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.















