मेहुण्यासह साडूला अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : तरुणीने प्रेमविवाह केल्यामुळे चिडलेल्या तिच्या भावाने आणि दाजीने तिच्या पतीचा खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून त्याचे अवशेष नदीच्यापात्रात फेकले. मोशी येथे १५ जून रोजी घडलेल्या या खुनाचा छडा लावण्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांना यश आले आहे.
समीर मोहम्मद शेख (वय२५, रा. रांधे, पारनेर) असे खून झालेल्याचे नाव आहे. पंकज विश्वनाथ पाईकराव (वय २८, मूळगाव भिंगे आडगाव), गणेश गायकवाड, गोपाळ गायकवाड (वय २२, दोघेही, ता. पारनेर, जि. अहमदनगर), किसन चक्रनारायण (वय ३३, रा, चाकण) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंकज पाईकराव, सुशांत गायकवाड आणि सुनील चक्रनारायण यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमीर आणि त्याच्या शेजारी राहणाऱ्या तरुणीचे प्रेमसंबंध होते.
दोघांचे कुटुंब वीस वर्षांपासून शेजारी राहत होते. दोन्ही कुटुंबांमध्ये सलोखा होता. मात्र दोघांनी प्रेमविवाह केल्यामुळे कुटुंबांत मोठी दरी निर्माण झाली होती. रांधे येथील अमीर शेख आणि त्याच्या शेजारी राहणाऱ्या तरुणीने चार महिन्यांपूर्वी आंतरधर्मीय विवाह केला.
त्यानंतर ते मोशी येथे राहत होते. अमीर खासगी वाहनावर चालक होता. बहिणीने आंतरधर्मीय विवाह केल्याच्या रागातून संशयितांनी १५ जून रोजी अमीरला दारू पिण्यासाठी बोलवून मोशी येथील आदर्शनगर येथून त्याचे अपहरण केले.
त्यानंतर गळा आवळून त्याचा खून केला आणि त्याचा मृतदेह आळंदी-चाकण रस्त्यावरील निर्जन ठिकाणी जाळला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे अवशेष नदीपात्रात फेकले. दरम्यान, अमीर बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या पत्नीने भोसरी एम. आय. डी. सी. पोलिस ठाण्यात दिली.
दरम्यान, आमीरच्या नातेवाइकांनी घातपाताचा संशय व्यक्त केल्यावर पोलिसांनी तपास करून खुनाचा उलगडा केला. पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक आयुक्त सचिन हिरे, वरिष्ट निरीक्षक गणेश जामदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र पानसरे, पोलिस अंमलदा चंद्रकांत गवारी, प्रवीण मुळूक, निती खेसे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
