गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाची कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : वाघोली येथील मारहाण, अपहरण व दरोडयाच्या गुन्हयातील ०५ आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २८ जुलै रोजी वाघोली येथील चोखीदाणी रोडवरील दुर्गामाता मंदिर येथे फिर्यादी हे त्यांचे चुलत भाऊ यांचे सह भाजी खरेदी करण्यासाठी पायी जात होते. त्यावेळी एका मुलाने फिर्यादीच्या खांद्याला धक्का दिला, म्हणून फिर्यादीने त्यास पाहून चालत जा, असे म्हणाले.
त्याचा राग मनात धरुन नमुद इसमांनी फिर्यादी व त्यांच्या बरोबरील तिघांना लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण केली. गाडीत जबरदस्तीने बसवून गाडीचे नुकसान झाले आहे. असे सांगून त्या बदल्यात पैशांची मागणी केली.
फिर्यादी याचा चुलता अजिज अहमद यांच्या गुगल-पे वरुन १८ हजार रुपये गाडीवरील चालकाच्या गुगल-पे अकाऊंटवर जबरदस्तीने घेतले. या बाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्हयाच्या संदर्भात गुन्हे शाखा, युनिट ६ कडील पोलीस अंमलदार हे युनिट हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त करत असताना यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, या गुन्हयातील आरोपी कुमार पवार, नितीन पवार, ओम गव्हाणे, मनोज निंबाळकर, विकास कांबळे हे आव्हाळवाडी गावच्या हद्दीत आव्हाळवाडी खराडी रोडवरील बायफ कंपनीजवळ लाल रंगाच्या गाडीसह उभे आहेत.
त्या ठिकाणी स्टाफसह जाऊन त्यांना पोलिसांनी शिताफीने सापळा रचून ताब्यात घेतले.त्यांचे कडून गुन्हयात वापरलेली कार तपास कामी जप्त करण्यात आली आहे. आरोपीना पुढील तपासकामी लोणीकंद पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
