पणन सहसंचालकांनी दिले चौकशीचे आदेश : आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : सेवाज्येष्ठतेनुसार नियुक्ती करणे अपेक्षित असताना शेकडो कर्मचाऱ्यांना डावलून कनिष्ठ लिपिकांची भुसार विभागप्रमुख व वाहन प्रवेश विभाग पदावर नियुक्ती केली आहे. त्यांची ही नियुक्ती नियमबाह्य ठरवावी, तसेच त्यांची चौकशी करावी, अशी मागणी होत होती. त्यानुसार चौकशीचे आदेश दि. २७ जूनला देण्यात आले होते. मात्र त्यावर कोणतीही चौकशी झाली नसल्याने अधिकारीच पाठीशी घालत आहेत का? असा संशय व्यक्त केला जात आहे.
व्यापारी तसेच अनेक कार्यकर्ते यांनी पणन संचालक, सहसंचालक व कृषी उत्पन्न बाजार समितीकडे याबाबत तक्रार केली होती. तक्रारी वाढल्याने अखेर पणन संचालक विकास रसाळ यांनी चौकशीचे आदेश दिले होते.
मार्केटयार्ड भुसार बाजारात गाळे धारकांना सेस, दप्तर तपासणी, व्यापार परवाने देणे याबाबत नोटिसा पाठवून, कारवाईचा फार्स दाखवून विशेष शुल्क घेतले जात असल्याचे व्यापारी सांगत आहेत. मार्केटमधील सर्व गोष्टींची दखल घेत याबाबत स्पष्टीकरण द्यावे.
तसेच बाजार स्तरावर चौकशी करण्यात यावी, यासंदर्भातील अहवाल तत्काळ द्यावा, असे आदेश पणन विभागाचे सहसंचालक राजेंद्रकुमार दराडे यांनी दिले होते. यावर जिल्हा उपनिबंधक यांनी चौकशी केली नसल्याने पुन्हा ३० जुलैला पारदर्शक चौकशी करावी असे अखेर महाराष्ट्र राज्य पणन संचालक विकास रसाळ यांनी आदेश दिले आहेत.
यावर आता चौकशी होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मार्केटयार्ड भुसार बाजार प्रमुख प्रशांत गोते यांच्याबाबत तक्रारी प्राप्त झालेल्या असून त्याबाबत राजेंद्र दराडे सहसंचालक यांना स्वतः चौकशी करून तातडीने अहवाल देण्यास सांगितले आहे. याबाबत काही गैर प्रकार असल्यास कोणासही पाठीशी घातले जाणार नाही.
पारदर्शक चौकशी केली जाणार आहे. अशी माहिती विकास रसाळ, पणन संचालक यांनी दिली. तर मार्केटयार्ड येथील भुसार बाजार गाळेधारकांना त्रास दिला जात आहे. त्याचबरोबर बाजार घटकातील विविध कामाबद्दल चौकशी करावी. याबाबत पणन संचालकांना निवेदन दिले आहे.
कारवाई नाही झाल्यास पुणे शहर काँग्रेस कमिटी वाणिज्य व उर्धाग विभाग व्यापारी सेलच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पुणे शहर जिल्हा व्यापारी सेलचे अरुण कटारिया यांनी दिला आहे.