वर्धमान प्रतिष्ठानमध्ये बरसल्या विचारधारा
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : भगवान महावीरांची करुणा, त्यांचे दर्शन, त्यांची दृष्टी हाच विश्वाच्या शांतीच्या परमकल्याणाचा मार्ग आहे. विकृतीपासून हा मार्ग खूप दूर आहे. त्यात दयाभाव, करुणा, प्रेम आहे. त्या वाटेने जाण्याचा प्रयत्न करा. मी किती क्षण दुःखात घालवले, किती क्षण मी आपल्या आत्म्याला दुःखी केले, इतरांना दुःख दिले याचा विचार करा. क्रोध, अहंकार, लोभ, भेदभाव यामुळे आपण आपल्या आत्म्याला दुःख देतो. ते महापाप आहे हे लक्षात घ्या, असे प्रतिपादन पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी केले.
प. पु. आचार्य श्री चंदनाजी म्हणाल्या, आपण भक्त, उपासक आहोत. ईश्वराच्या मार्गावरून चालणारे यात्री आणि साधक आहोत अशी भावना भक्ताच्या मनात असणे गरजेचे आहे. विचार आणि विश्वास यात अंतर आहे. विचार बदलत राहतात. ते परिवर्तनशील असतात. परंतु विश्वास अढळ असतो. राग आणि द्वेष जिथे संपतो तोच धर्म असतो.
जीवनातील ज्या विकृती आहेत, कशायने भरलेले आपले चित्त जो स्वच्छ करतो तोच धर्म आहे. सम्यक दर्शनाने धर्माची सुरुवात होते. सम्यक दर्शन हे साधनेचे पहिले पाऊल आहे.
प. पु. आचार्य श्री चंदनाजी पुढे म्हणाल्या, माझ्या भल्यासाठी मी चांगले काम करू इच्छितो, ईश्वराची आराधना करू इच्छितो हा भाव मनात जागणे आवश्यक आहे.
सम्यक दर्शनाशी अनुरूप असे आपल्या जीवनातील आचार, विचार असणे गरजेचे आहे. आपल्या विचारांच्या आधारानेच आपण जीवनातील निर्णय घेत असतो. विविध गोष्टींचे आकलन होण्यासाठी इंद्रियांची मदत होते परंतु विचार आणि भावनांच्या आधारानेच आपण निर्णय घेत असतो. त्यामुळे ते चांगले कसे राहतील असा प्रयत्न करायला हवा.
प. पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी सांगितले की, भगवान एकच आहेत त्यांचा धर्मही एक आहेत. संप्रसादायाचे भेद निर्माण झाले कारण प्रत्येकाने त्याच्या पद्धतीने अर्थ काढला. त्यातून हे प्रकार निर्माण झाले. भगवान महावीरांनी सांगितलेल्या खऱ्या धर्माचे हे स्वरुप समजून घ्यायला हवे.
आपल्याला जे हवे ते आपण आपल्या सोयीने ऐकतो, समजून घेतो. परंतु जे आहे तसे जाणून घेण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच सम्यक दर्शन आहे. ती दृष्टी विकसित होणे गरजेचे आहे. राग, द्वेष यांच्यापासून मुक्त होऊन तुम्ही जगाकडे सम्यक दृष्टीने पाहू शकलात तर जीवनातील खरा आनंद तुम्हाला गवसत जाईल आणि आयुष्याचा खरा अर्थ उमगेल.
प. पु. साध्वी श्री शिलापीजी म्हणाल्या, तीर्थकरांनी जे काही केले तीच आपली चर्या बनलेली आहे. चांगल्या भावनेने केलेले प्रत्येक काम हे पुण्यकर्माचे असते. दिवसभरात आपण जे काही करू त्यासाठी मिच्छामि दुग्गडम म्हणून त्या दिवसाचा हिशोब पूर्ण करावा.
जे आपल्यापेक्षा दुर्बल आहेत त्यांच्याप्रति आपण करुणाभाव राखणे गरजेचे आहे. रात्री झोपण्यापूर्वी आपले मन स्वच्छ, शांत राहिल असा प्रयत्न प्रत्येकाने करावा. मन प्रसन्न असेल तर सगळीकडे आनंद राहतो. कशायशून्य मन राहिले तर मन आनंदी, प्रेमपूर्ण राहू शकेल.
