पुणे महानगर पत्रकार संघाचा संघटन बळकटीचा एल्गार
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, मुंबई या विश्वासार्ह आणि सशक्त संघटनेला यंदा ८७ वर्षे पूर्ण होत असताना, महाराष्ट्रातील पत्रकारांच्या हितरक्षणासाठी संघटन अधिक प्रभावीपणे उभे राहावे, यासाठी पुणे शहरात संघटनबांधणीची गती वाढविण्याचे आवाहन परिषदचे विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी केले.
वानवडी येथील जांभूळकर गार्डनमध्ये झालेल्या पुणे महानगर पत्रकार संघाच्या विशेष बैठकीत त्यांनी मार्गदर्शन केले. या वेळी परिषदचे माजी अध्यक्ष शरद पाबळे, उपाध्यक्ष गणेश मोकाशी, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष वडगुळे, तसेच सोशल मीडिया विभागाचे सुनील वाळुंज आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठकीत पत्रकारांवर होणारे हल्ले, पेन्शन आणि कल्याणकारी योजनांमधील अडथळे, आरोग्यविषयक समस्यांसह विविध महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. पत्रकारांनी गरज पडल्यावर नव्हे, तर वेळेआधी संघटनेशी जोडले गेले पाहिजे, असे स्पष्ट मत पुणे महानगर पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद गव्हाणे यांनी व्यक्त केले.
पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद सदैव भक्कम पाठीशी उभी राहिली असून भविष्यातही संघटनेतील प्रत्येक पत्रकाराच्या सोबत राहील, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला. अधिकाधिक पत्रकार बंधू-भगिनींनी संघटनेत सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहनही मान्यवरांकडून करण्यात आले.
















