वर्धमान प्रतिष्ठानमध्ये प्रवचनमालेत मार्गदर्शन
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : आपण अहिंसक आहोत. सर्वजण शाकाहाराचे पालन करतो. हे आपल्यावर जे संस्कार आहेत ते आपल्या तीर्थकरांचे, धर्मगुरूंचे आहेत. त्याच्या जोडीला एक सक्रियतादेखील आवश्यक आहे. प्रत्येकाने आपले चारित्र्य संपन्न करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे विचार पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी मांडले.
वर्धमान प्रतिष्ठानच्या वतीने चातुर्मासानिमित्ताने पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी यांची प्रवचनमाला आयोजित करण्यात आली आहे. त्यात त्यांनी आज संबोधित केले. यावेळी प. पु. साध्वी श्री शिलापीजी यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अमेरिकेतून आलेल्या काही जैन महिला भाविकही यावेळी आवर्जून उपस्थित होत्या. त्यांनीही मनोगत व्यक्त केले. तिथे वीरायतनचे जे काम सुरू आहे त्याची माहिती त्यांनी दिली. पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी म्हणाल्या, अमेरिकेतसुद्धा आपण वीरायतनची स्थापना केलेली आहे.
त्याचेही उत्तम काम सुरू आहे. जर आपण परदेशात इतके चांगले काम करू शकतो तर भारतातही चांगले काम होणे गरजेचे आहे. अमेरिका, लंडन, आफ्रिकेतून ४० हून अधिक मुले आता तिथे आलेली आहेत. रुग्णालयात, शाळेत जाऊन ती मुले आपली सेवा देणार आहेत. भगवान महावीरांच्या सुंदर विचारांचा प्रसार आपण करणे गरजेचे आहे.
आपल्याला कार्याचा विस्तार करायचा असेल तर आपल्यालाही थोडे बदलावे लागेल. आज जैन समाज शिक्षण, व्यवसाय अशा सगळ्याच प्रतिष्ठेच्या क्षेत्रात जैन समाजाला सन्मान लाभतो आहे. आज अमेरिकेत २५ स्टेटमध्ये जैन समाज विस्तारलेला आहे. मी त्या सगळ्या ठिकाणी गेलेले आहे.
मी तिथे राहून लोकांशी संपर्क साधून लोकांमध्ये जैनत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे. प. पु. साध्वी श्री शिलापीजी म्हणाल्या, शरीर हे साधना करण्यासाठीचे एक उत्तम साधन आहे. परंतु त्याची आसक्ती निर्माण झाली तर आपल्याला लक्ष्यापर्यंत पोहचता येणार नाही. शरीराला आपण भोगाचे साधन मानले आहे किंवा त्याचे महत्त्व खूप कमी करून टाकले आहे.
खाप्या मजा करा अशीही भूमिका अनेकजण घेतात आणि शरीरालाच जीवन मानतात. याने आत्म्याची प्राप्ती होत नाही म्हणून शरीरालाच क्लेश देणारेही अनेकजण आहेत. सगळ्या बाबतीत संतुलन आवश्यक आहे.
प. पु. साध्वी श्री शिलापीजी पुढे म्हणाल्या, आपल्या आत असणारे कशाय आपल्या कर्मांचे नुकसान करतो. जितके कशाय अधिक तितक्या मोठ्या प्रमाणावर बंधन निर्माण होते. जितका अहंकार तितकेच बंधन अधिक. जितकी विनम्रता अधिक तितकेच जीवन सुलभ होते. कशाय हेच बंधनाचे खरे कारण आहे.
