वर्धमान प्रतिष्ठानमध्ये चातुर्मासानिमित्त प्रवचनमालेतून मार्गदर्शन
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : पर्युषण पर्व हे एक विलक्षण पर्व आहे. पर्युषण पर्व आपल्यासाठी आहे, आपल्याला ओळखण्यासाठी आहे, आपल्या विचारांच्या शुद्धीसाठी हे पर्व महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन पद्मश्री प.पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी केले.
वर्धमान प्रतिष्ठानमध्ये चातुर्मासानिमित्त आयोजित केलेल्या प्रवचनमालेमध्ये त्यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प.पु. साध्वी श्री शिलापीजी यांनीही मार्गदर्शन केले.
प.पु. आचार्य श्री चंदनाजी म्हणाल्या, “पर्युषण पर्व फक्त आपल्या आयुष्यासाठी, आपल्या जीवनासाठी आहे. आपण असलो तर ‘गुरु’ आहे, आपण असलो तर ‘परिवार’ आहे, आपण असलो तर ‘देव’ आहे; जर आपण नसलो, तर काहीही नाही. आपल्याला एका ठिकाणी शांत बसता आले पाहिजे. वातावरणाचा आपल्यावर खूप प्रभाव पडतो.
शब्दांच्या भावाची जी अनुभूती असते, तिच्या प्रभावाने आपला आनंद द्विगुणीत होतो. आपण कमावलेली ऊर्जा आपल्या जीवनाला विलक्षण ताकद आणि शक्ती मिळवून देते. पर्युषण पर्वामध्ये आलोचना प्रवृत्ती सर्वात महत्त्वाची असते. आपल्याला आपल्या मनाची शांती टिकवून ठेवायची आहे.
ती कशा पद्धतीने टिकविली पाहिजे? तर आपले हे मन जे जगात भ्रमण करत असते, त्याला संकल्पपूर्वक शांत केले पाहिजे. मन शांत ठेवण्याची गोष्ट आपल्याला देवाने सांगितली आहे. गुरुवंदना केली पाहिजे. प्रतिक्रमण सगळ्यात आवश्यक आहे.
जीवनाला आवश्यक असते सुख, शांती, आनंद. जीवनात एक लक्षात ठेवा, दुःख बाहेरून कधीही येत नाही आणि आनंद हा आपल्या अंतरात्म्यात असतो. प्रतिक्रमण म्हणजे आपण आपल्या अंतरात्म्यात डोकावून पाहिले पाहिजे. प्रतिक्रमण आनंदावर आलोचना करत असते.
आपण आपल्या आयुष्यात आनंद शोधत असतो, पण दिवसाला आपण किती वेळा हसतो आणि किती वेळा चिंतेत असतो? आपल्या लहानपणी आपल्याला निरागस आनंद देणारे खेळ असतात. मोठेपण मात्र आपले चिंतेत जात असते.”
“प्रतिक्रमण म्हणजे प्रति म्हणजे ‘मागे’, आणि क्रमण म्हणजे ‘चालणे’. प्रतिक्रमण म्हणजे ‘मागे चालणे’. प्रतिक्रमणात आपल्या जीवनातील स्मृतींमध्ये जे पाप आहे, लोभ आहे, क्रोध आहे, अहंकार आहे, ते सगळे मागे टाकले पाहिजे, आपले मन साफ करून टाकले पाहिजे. आपल्या जीवनातल्या विकृतींवर आपण खुश होऊ शकत नाही.
प्रतिक्रमणाने या विकृती साफ करण्यास मदत होते. आपल्या जीवनाला जर आनंदपूर्वक, प्रेमपूर्वक ठेवायचे असेल, तर प्रतिक्रमणाचा मार्ग अवलंबा. आपण मागे वळून आपल्यातला चांगुलपणा पाहिला पाहिजे आणि वाईटाला निरोप दिला पाहिजे. थोडक्यात, चांगल्या कर्मांना आठवा आणि वाईट कर्मांना निरोप द्या यासाठी प्रतिक्रमण महत्त्वाचे आहे,” असे मत प.पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी व्यक्त केले.
