सेवा व उद्योग क्षेत्रातील कर्तुत्वान महिलांचा सन्मान
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : प्रवीण मसालेवालेचे संस्थापक स्व. हुकमीचंद (भाऊ) चोरडिया आणि स्व. सौ. कमलबाई चोरडिया (बाई) यांच्या प्रेरणेने प्रविण मसालेवाले ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारे सुहाना कमल जीवनादर्श पुरस्कार सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष पद्मभूषण डॉ शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. घोले रस्त्यावरील पं जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे हा कार्यक्रम झाला.
यावेळी सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, प्रविण मसालेवाले ट्रस्टचे विश्वस्त राजकुमार चोरडिया, सुहाना कमल पुरस्कार समितीच्या अध्यक्षा व माजी खासदार वंदना चव्हाण, प्रविण मसालेवाले ट्रस्टचे विश्वस्त राजकुमार चोरडिया, मधुबाला चोरडिया, विशाल चोरडिया, आनंद चोरडिया आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
मधुबाला चोरडिया यांच्या ‘बिकट वाट यशाची’ या पुस्तकाच्या ऑडिओ बुकचे प्रकाशन देखील यावेळी डॉ शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते संपन्न झाले. प्रवीण मसाले समूहाचा प्रेरणादायी प्रवास यामध्ये मांडण्यात आला आहे.
यावेळी ज्येष्ठ समाजसेविका, माजी राष्ट्रीय महिला हॉकी खेळाडू आणि ‘कनेक्टिंग’ या समाजसेवी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा अर्णवाझ दमानिया यांना सुहाना कमल जीवनादर्श पुरस्कार, ज्येष्ठ समाजसेविका आणि माहेर आश्रमच्या संस्थापिका सिस्टर लुसी कुरियन यांना सुहाना कमल सेवा सन्मान पुरस्कार, आर्टेमिस टेक प्रा लिमिटेडच्या कोमल वागसकर यांना सुहाना कमल उद्यम सन्मान पुरस्कार तर सांगली येथील पयोद इंडस्ट्रीजच्या स्नेहल व देवानंद लोंढे यांना सुहाना कमल युगल उद्यम सन्मान पुरस्कार देत सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ, मानपत्र, मानचिन्ह आणि ५१ हजार रुपये रोख असे या पुरस्कारांचे स्वरूप होते.
राजकुमार चोरडिया यांनी मनोगत व्यक्त केले. राजेश दामले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आनंद चोरडिया यांनी आभार मानले.
विशाल चोरडिया म्हणाले, “प्रत्येक उद्योजकाचा लढा हा कायमच प्रेरणादायी असतो, हे आम्ही आमचे आजी आजोबा यांच्या रूपात जवळून पाहिले आहे. हा पुरस्कार सोहळा आमच्यासाठी म्हणूनच भावनिक नाते असलेला आहे. आम्ही समाजात जेव्हा अशा लढ्याच्या कथा पाहतो तेव्हा कायमच आम्ही आजी आजोबांच्या आठवणीत हरवतो. सुरुवातीला आम्ही उद्योग जननी कमल पुरस्कार या नावाने उद्योजक महिलांना पुरस्कार द्यायचो, मात्र आमच्या आजीची अनेक रूप आम्ही अनुभवीली त्या पत्नी, आजी, आई होत्याच यासोबतच त्या एक खंबीर नेतृत्व असणारी स्त्री होत्या, दाता होत्या. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आयाम दर्शविणारे पुरस्कार दिले जावेत या उद्देशाने आम्ही यावर्षी पासून चार क्षेत्रात पुरस्कार देणे सुरू केले. ज्याप्रमाणे आजी आजोबांचा प्रविण मसालेवाले हा ब्रँड पुण्यातून देशभरात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर गेला त्याप्रमाणे यावर्षी महाराष्ट्रापुरता असलेला हा पुरस्कार देखील पुढील वर्षीपासून आम्ही व्याप्ती वाढवत राष्ट्रीय स्तरावर नेत आहेत याचा आम्हाला आनंद आहे. आजच्या या पुरस्कार्थी महिला या उद्योग क्षेत्रासाठी नव्हे तर राष्ट्र निर्माणामध्ये आदर्श ठरतील असा विश्वास विशाल चोरडिया यांनी व्यक्त केला.
हे पुरस्कार वितरीत करीत असताना ते निरपेक्षपणे दिले जावेत या हेतूने ट्रस्टच्या वतीने आयोजन व निवड समितीची स्थापना करण्यात आली आहे. माजी खासदार वंदना चव्हाण या समितीच्या अध्यक्षस्थानी असून समितीमध्ये मुंबईच्या माजी महापौर निर्मला सामंत – प्रभावळकर, माजी पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर, न्यायाधीश शालिनी फणसळकर – जोशी, जेष्ठ पत्रकार विजया पाटील, शिक्षणतज्ज्ञ स्वाती मुजुमदार, उद्योजिका सुलज्जा फिरोदिया मोटवानी आणि ज्येष्ठ अभिनेत्री निशिगंधा वाड यांचा समावेश आहे.