हडपसर पोलिसांनी तरुणाला केले अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे ; नंबर प्लेट नसलेली दुचाकी अडवल्यामुळे तरुणाने वाहतूक पोलिसाला १०० मीटर अंतर फरफटत नेल्याची धक्कादायक घटना लोणी काळभोर परिसरात घडली आहे. या घटनेत पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २८ ऑगस्ट रोजी पोलीस अंमलदार चेतन सुलाखे हे सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हडपसर वाहतूक विभाग कार्यालयाच्या बाजूला, हडपसर इंडस्ट्रियल इस्टेट कडील रस्त्यावर कर्तव्यावर होते.
वाहतूक नियमन करताना त्यांना एक विना नंबरची दुचाकी दिसली. त्यांनी तरुणाला गाडी बाजूला घ्यायला सांगितली. बिना नंबर प्लेटची व इन्शुरन्स संपलेली मोटारसायकल चालवत असल्याने त्यास लायसन्स विचारून गाडी बाजूला घेण्यास सांगितले असता, त्याने मोटारसायकलची रेस देऊन फिर्यादी यांना ९० ते १०० मीटर रस्त्याने फरफटत नेऊन दुखापत केली.
चेतन सुलाखे यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल तक्रार दाखल केल्याने पोलिसांनी ऋतिक प्रकाश हिंगणे (वय ३४ वर्षे, रा. प्रतिभा रेसीडन्सी, हिंगणेमळा, हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक विलास सुतार तपास करीत आहेत.
