फुलचंद बाठीया : मोफत दंतरोग तपासणी शिबिरात १२० रुग्णांची तपासणी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
नगर : आनंदऋषीजी हॉस्पिटलचे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याचे कार्य ‘दिशादर्शक’ असल्याचे प्रतिपादन उद्योजक फुलचंद बाठीया यांनी केले. हॉस्पिटलमध्ये मोफत दंतरोग तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात १२० रुग्णांची मोफत दंत तपासणी करण्यात आली.
आनंदऋषीजी हॉस्पिटलची आरोग्यसेवा रुग्णांसाठी संजीवनी ठरत आहे. आरोग्य सुविधा घराघरात पोहोचविण्याचे कार्य आणि आरोग्याबद्दल समाजात जागृती निर्माण करण्याचेही कार्य हॉस्पिटलच्या माध्यमातून होत आहे.
शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवेचा लाभ पोहोचवून माणुसकीच्या भावनेने उभे राहिलेले दिशादर्शक कार्य समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे उद्गार पुण्यातील उद्योजक फुलचंद बाठीया यांनी काढले.
जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मोफत दंतरोग तपासणी व उपचार शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी फुलचंद बाठीया बोलत होते. यावेळी चंचलाताई बाठीया, चंद्रकांत भंडारी, संतोष बोथरा, सतीश (बाबूशेठ) लोढा, मानकचंद कटारिया, डॉ. आशिष भंडारी, सुमित लोढा, वसंत चोपडा, डॉ. अर्पणा पवार, डॉ. प्राची गांधी, डॉ. स्वराज ठोले, डॉ. प्रणव डुंगरवाल, डॉ. तृप्ती डुंगरवाल, डॉ. कोमल ठाणगे, डॉ. अश्विनी पवार आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात बोलताना संतोष बोथरा म्हणाले की, शासकीय योजनेत दातांचे विकार समाविष्ट नसल्याने महागडे उपचार सर्वसामान्यांना परवडत नाहीत. यासाठी आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये डेंटल विभागाच्या माध्यमातून ना नफा, ना तोटा या तत्त्वावर आरोग्य सुविधा दिल्या जात आहेत.
पैशाअभावी उपचार थांबू नयेत, या प्रामाणिक हेतूने हॉस्पिटलचे कार्य सुरू आहे. मानवसेवेच्या भावनेने लावण्यात आलेल्या आरोग्यसेवेच्या रोपाचे वटवृक्ष बहरले असून, अनेकांना त्याखाली सावली मिळत आहे. आरोग्याची गंगा शेवटच्या घटकापर्यंत नेण्याचे काम या हॉस्पिटलच्या माध्यमातून सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. प्राची गांधी यांनी दातांची सफाई करण्यासोबत मौखिक कॅन्सरपर्यंत सर्व सुविधा व उपचार हॉस्पिटलच्या दंत विभागात उपलब्ध असल्याचे सांगितले. दंतरोग तपासणी शिबिरात १२० रुग्णांची मोफत दंत तपासणी करण्यात आली.
दंतरोग तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची दंत तपासणी करून त्यांना मार्गदर्शन केले. या शिबिरामध्ये मेटल कॅप, सिरेमिक कॅप, रूट कॅनल, दातांची कवळी बसविणे, दात साफ करणे आणि दातांमध्ये सिमेंट भरणे यांसारखे उपचार अल्पदरात करण्यात येत आहेत. सूत्रसंचालन डॉ. आशिष भंडारी यांनी केले तर आभार सतीश लोढा यांनी मानले.

