विश्रांतवाडी पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : घरफोडी करणाऱ्या चोराच्या मुसक्या आवळण्यात विश्रांतवाडी पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून चोरीस गेलेली मोटारसायकल, कार, असा एकूण ३,८५,९५०/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीकडून हडपसर, मुंढवा, चंदननगर, भोसरी पोलीस ठाण्यातील एकूण ४ गुन्हे उघड झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरात घरफोडीचे गुन्हे गेल्या काही दिवसांत वाढले होते. विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान, पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार तपास करत असताना २ ऑक्टोबर रोजी पोलीस अंमलदार संजय बादरे, अमजद शेख, वामन सावंत व किशोर भुसारे यांना त्यांच्या खास बातमीदाराकडून माहिती मिळाली की, दाखल गुन्ह्यातील आरोपी गुन्हा करून आपल्या गावी मोघा (ता. उदगीर, जि. लातूर) येथे आहे. त्यानुसार पोलिसांनी लातूर येथे जाऊन आरोपीचा शोध घेतला असता, तो त्याच्या घरी मिळून आला.
पोलिसांनी शेखर संगाजी जाधव (वय २५ वर्षे, रा. मोध, ता. उदगीर, जि. लातूर) यास ताब्यात घेतले आहे. त्याने व त्याच्या अल्पवयीन साथीदाराने मिळून हा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. त्याच्याकडून दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोबाईल पॉवर बँक व कार चार्जर असा १,४३,४५०/- रुपये किमतीचा माल हस्तगत करण्यात आला आहे.
आरोपीकडे विश्वासात घेऊन अधिक तपास केला असता, त्याने हडपसर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात चोरलेली रोख रक्कम, चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेली मोटारसायकल, भोसरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरलेली मोटारसायकल असा एकूण ३,८५,९५०/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपीकडून हडपसर, मुंढवा, चंदननगर आणि भोसरी पोलीस स्टेशनमधील एकूण ४ गुन्ह्यांचा तपास लागला आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव (विश्रांतवाडी पोलीस स्टेशन), पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर साळूखे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड, पोलीस अंमलदार बबन वणवे, यशवंत किर्वे, कृष्णा माचरे, अमजद शेख, वामन सावंत, संजय बादरे, संपत भोसले, संदीप देवकाते, अक्षय चपटे, आणि किशोर भुसारे यांनी केली आहे.

