बार्शी तालुका पोलिसांची मोठी कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : बार्शी तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गहाळ झालेले १३ मोबाईल शोधून तक्रारदारांना पोलिसांनी परत केले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०२४ मध्ये हरवलेल्या मोबाईलच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. सायबर पोलीस स्टेशनच्या मदतीने तांत्रिक विश्लेषण करून या गहाळ मोबाईलचा शोध घेण्यात आला. गहाळ झालेल्या मोबाईलपैकी एकूण १३ मोबाईल, ज्यांची किंमत २,२५,९८२ रुपये आहे, ते मिळून आले आहेत.
हे मोबाईल बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. एन. जगदाळे यांच्या हस्ते तक्रारदारांना परत करण्यात आले. ही कामगिरी सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, बार्शी उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल, आणि बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. एन. जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या कामगिरीत बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल उंदरे, लोंढे आणि सायबर पोलीस स्टेशनचे रतन जाधव यांनी सहभाग घेतला. सदर कारवाईमुळे तक्रारदारांनी समाधान व्यक्त केले असून, यापुढे ज्या मोबाईल धारकांचा मोबाईल गहाळ झाल्यास किंवा हरवल्यास त्यांनी तात्काळ बार्शी तालुका पोलीस स्टेशनमध्ये मोबाईलचे संपूर्ण कागदपत्रांसह तक्रार नोंदवावी, असे आवाहन बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. एन. जगदाळे यांनी केले आहे.

