स्वामीराज डेव्हलपर्सच्या भागीदारासह ६ जणांवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पुणे महापालिकेची कोणतीही बांधकाम परवानगी न घेता धायरी परिसरात इमारत उभारून त्यातील फ्लॅटची विक्री करण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या विक्री व्यवहाराची नोंदणी करताना पुणे महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाचे मंजूर बांधकाम नकाशे, कमेन्समेंट प्रमाणपत्र व कम्प्लिशन प्रमाणपत्र अशी बनावट कागदपत्रे सादर करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी स्वामीराज डेव्हलपर्सच्या भागीदारासह सहा जणांवर वर्षभरानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी सह दुय्यम निबंधक व्ही. डी. कासेवाड यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी स्वामीराज डेव्हलपर्सचे भागीदार संदीप दामोदर कडू (वय ३८, रा. विठ्ठलनगर सोसायटी, आनंदनगर, वडगाव धायरी), साईनाथ वासुदेव सपकाळ (वय ३७, रा. तृप्ती गार्डन, आनंदनगर, सिंहगड रोड), महेश महाबळेश्वर नाईक (वय २५, रा. विठ्ठलनगर सोसायटी, वडगाव धायरी), आश्रफ खलील शेख (वय २५, रा. हर्ष पॅलेस, आनंदनगर, सिंहगड रोड), तसेच दस्त लिहून घेणारे संदेश राजू आवळे (वय ३४) आणि प्रियंका संदेश आवळे (वय २९, रा. स्वामीराज, वडगाव धायरी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार कर्वेनगर येथील काकडे प्लाझामधील सह दुय्यम निबंधक कार्यालयात १० डिसेंबर २०२४ रोजी घडला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वामीराज डेव्हलपर्स यांनी धायरी परिसरात ‘स्वामीराज’ नावाची इमारत उभारली होती. या इमारतीतील फ्लॅट आवळे कुटुंबाला विकण्यात आला. या व्यवहाराचा दस्त १० डिसेंबर २०२४ रोजी कर्वेनगर येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदविण्यात आला.
नोंदणीसाठी सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांची तपासणी करत असताना मुद्रांक जिल्हा अधिकारी यांच्या परिपत्रकानुसार करण्यात आलेल्या पडताळणीत दस्तास जोडलेल्या पुरक कागदपत्रांबाबत शंका निर्माण झाली. त्यामुळे पुणे महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाकडे या कागदपत्रांची खातरजमा करण्यासाठी ती पाठविण्यात आली.
१७ फेब्रुवारी २०२५ रोजी महापालिकेच्या बांधकाम विकास विभागातील उपअभियंत्यांनी उत्तर देताना, धायरी येथील सर्व्हे नंबर १०५, हिस्सा ५/१ येथील बांधकामास या विभागाकडून कोणतीही परवानगी देण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट केले.
त्यानुसार, संबंधित आरोपींनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लबाडीच्या उद्देशाने बनावट कमेन्समेंट प्रमाणपत्र, कम्प्लिशन प्रमाणपत्र आणि बांधकाम मंजूर नकाशे तयार करून ते खरे असल्याचे भासवत दस्त नोंदणी केली व शासनाची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.
धायरीतील ही इमारत बेकायदेशीर असून त्यातील फ्लॅटही बनावट कागदपत्रांच्या आधारे विकण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत शिरोळे करीत आहेत.
















