महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
आळंदी : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पर्व काळात तिर्थक्षेत्र आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी सातव्या माळेला पद्मावती मातेच्या दर्शनासाठी हरिनामाच्या गजरात आगमन झाले.
दुपारी बारा वाजता संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चल पादुका पालखीतून पद्मावती मातेच्या दर्शनासाठी मार्गस्थ झाली. दुपारी एक वाजता पद्मावती मंदीरात आगमन झाल्यानंतर आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमाप यांच्या हस्ते आई पद्मावती मातेची विधीवत महापूजा करण्यात आली.
यावेळी पालखी सोहळाप्रमुख योगी निरंजनाथ, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, तुकाराम मारे, बाळकृष्ण मोरे, श्रीकांत लवांडे, मानकरी साहिल कुऱ्हाडे, सुरज आरु, बलाळेश्वर वाघमारे, सचिन रानवडे, सुनिल रानवडे, पद्मराज रानवडे, पांडुरंग रानवडे, संकेत वाघमारे, विठ्ठल घुंडरे तसेच वारकरी, आळंदीकर ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी रानवडे परिवाराकडून विश्वस्त व मानकरी यांचा सन्मान करण्यात आला.माऊलींची पालखी पद्मावती मातेच्या मंदिरातून हरीनामाचा गजर करत विश्रांतवड येथुन विसावा घेऊन भोसले वस्ती येथे आली. यावेळी मोहन भोसले व संतोषराजे भोसले यांच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले.
रात्री आठ वाजता पालखीचे माऊली मंदिरात आगमन झाले, आरती होऊन मानकऱ्यांना नारळ प्रसाद देण्यात आला. येत्या शनिवारी सायंकाळी पाच वाजता माऊलींची पालखी खंडोबा मंदिर येथे सीमोल्लंघन सोहळ्यानिमित्त जाणार असल्याचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी सांगितले.

