पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते गणेश मंडळांचा सन्मान
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
सोलापूर : सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते गणेश मंडळांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. शिवप्रेमी गणेशोत्सव मंडळ, बीबीदारफळ यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
सन २०२४ मध्ये साजरा करण्यात आलेल्या श्री गणेश उत्सवाच्या दरम्यान सामाजिक सलोखा टिकावा यासाठी सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या अंतर्गत गावांमधील गणेश मंडळांनी सामाजिक उपक्रम राबवावेत, अशी संकल्पना सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी मांडली होती.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, सोलापूर ग्रामीण उपविभाग यांनीही सहकार्य केले. याच पार्श्वभूमीवर सोलापूर तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी पोलीस स्टेशनच्या कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांसह जनजागृती केली होती.
गणेश मंडळांसाठी सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सोलापूर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एकूण १२० गणेश मंडळांचे परीक्षण व मुल्यमापन करण्यात आले, ज्यासाठी राज साळुंखे आणि आतिश गवळी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
गुणांकनानुसार, मौजे बीबीदारफळ ता. उत्तर सोलापूर येथील शिवप्रेमी गणेशोत्सव मंडळाने प्रथम क्रमांक मिळवला. मौजे बोरामणी येथील जयलक्ष्मी तरुण मंडळाने द्वितीय क्रमांक, तर मौजे मार्डी येथील नागेश युवक मंडळाने तृतीय क्रमांक पटकावला. उत्तेजनार्थ पारितोषिके होनसळ येथील जय श्रीराम मंडळ व हगलूर येथील जय हनुमान तरुण मंडळ यांना देण्यात आली.
सोलापूर ग्रामीण उपविभागाच्या स्तरावर उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांनी सोलापूर उपविभागातून सर्वोत्कृष्ट तीन गणेश मंडळांची निवड केली होती. त्यांना पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमात गणेश मंडळांचे कार्यकर्ते, पोलीस पाटील, पोलीस अधिकारी, आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी केले. सूत्रसंचालन सहायक पोलीस निरीक्षक समाधान कदम यांनी केले, तर आभार प्रदर्शन सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज अभंग यांनी केले.

