दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाची कामगिरी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : दुचाकी चोरणाऱ्या आरोपींकडून वाहन चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणण्यात दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाला यश आले आहे. आरोपींकडून ९०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाचे पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये वाहनचोरीच्या गुन्ह्याचा तपास करीत होते. त्यावेळी पोलिस अंमलदार अजित शिंदे आणि अमित गद्रे यांना गोपनीय माहिती मिळाली की, दरम्यानच्या गुन्ह्यातील दोन संशयित व्यक्ती चोरीच्या गाडीसह रविवार पेठ येथे आहेत.
पोलिसांनी तिथे जाऊन प्रणव प्रकाश ठाकुर (वय २४ वर्षे, रा. रविवार पेठ फुलवाला चौक, पुणे) आणि अजय दत्तात्रय कुमकर (वय २५ वर्षे, रा. गुरूवार पेठ फुलवाला चौक, पुणे) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातील दुचाकी त्यांनी रविवार पेठ परिसरातून चोरी केली असल्याचे सांगितले.
त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी आणखी एक दुचाकी चोरल्याचे कबूल केले. आरोपींकडून एकूण २ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणून त्यांच्याकडून ९०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कारवाई दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेणी पोलीस उपनिरीक्षक शाहिद शेख, पोलीस अंमलदार बाळू गायकवाड, प्रदीप राठोड, धनंजय ताजणे, गणेश ढगे, अजित शिंदे, इरफान पठाण, मनीषा पुकाळे, रविंद्र लोखंडे, साईकुमार कारके, महेश पाटील, श्रीकांत दगडे, शिवाजी सातपुते, अमित गद्रे, अक्षय गायकवाड, नारायण बनकर यांनी केली आहे.
