दिल्लीसह पाच शहरात आयोजन
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : देशातील नागरिकांमध्ये हाडांच्या ऑस्टिओपोरोसिस आणि ऑस्टिओआर्थरायटिस या समस्या वाढत आहेत. जीवनदायी आरोग्यासाठी हाडांची निगा राखणे आणि हाडांच्या आरोग्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी पुण्यात प्रथमच ऑर्थोपेडिक वॉकेथॉनचे आयोजन पूना क्लब येथे रविवारी करण्यात आले होते.
पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, डॉ. प्रदीप मुनोत, शैलेश रांका, रिथिम वाघोलीकर, आणि राकेश जैन यांनी वॉकेथॉनला हिरवा झेंडा दाखवून हजारो स्पर्धकांच्या उपस्थितीत जल्लोषात वॉकेथॉन पार पडला.
तब्बल साडेचार हजार जणांनी या वॉकेथॉनसाठी नोंदणी केली होती. वॉकेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्यांसाठी टी-शर्ट, मेडल्स, नाश्ता आणि प्रमाणपत्राची व्यवस्था करण्यात आली होती. आयोजक शिल्पा मुनोत यांनी सांगितले की, मुंबईतील फूट अँकल क्लिनिकच्या सहकार्याने देशात प्रथमच ऑर्थोपेडिक वॉकेथॉनचे आयोजन विविध शहरांमध्ये करण्यात आले आहे.
फाउंडेशनने सहा राज्यांमध्ये विशेष ३० ऑर्थोपेडिक शिबिरे, मोफत शस्त्रक्रिया, जागरूकता शैक्षणिक कार्यक्रम, आणि सामुदायिक उपक्रम आयोजित केले आहेत. दिल्ली, मुंबई, पुणे, हैदराबाद, आणि जोधपूर या पाच शहरांमध्ये हे वॉकेथॉन आयोजित करण्यात आले होते. तीन किमी आणि पाच किमी वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले.