महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पिंपरी : “माझे मत स्वत:साठी, माझे मत देशासाठी”, “मी मतदान करणार, तुम्ही मतदान नक्की करा” “उठ तरूणा जागा हो, लोकशाहीचा धागा हो” अशा घोषणांनी इंदिरा कॉलेज आणि डॉ. डी.वाय. पाटील कॉलेजसह शहरातील महाविद्यालयांचा परिसर दुमदुमला.
यावेळी मतदार जनजागृती अभियानात मोठ्याप्रमाणात विद्यार्थी, नवमतदार, शिक्षक, शिक्षेकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याची शपथ घेतली. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या पिंपरी, भोसरी आणि चिंचवड मतदार संघात मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी महापालिकेच्या वतीने आयुक्त शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त तथा स्वीप नोडल विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त अण्णा बोदडे यांच्या नियंत्रणाखाली मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.
त्यानुषंगाने रविवारी शहरातील इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स आणि सायन्स तसेच डॉ.डी.वाय. पाटील इंजिनियरिंग कॉलेज संत तुकाराम नगर येथे मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आला.
यावेळी इंदिरा कॉलेजचे प्राचार्य डॉ. जनार्धन पवार, थॉमसन वर्गीस, मुख्य लिपिक किसन केंगले, अभिजित डोळस, विकास गायकांबळे, ओंकार पवार महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह मोठ्या संख्येने नवमतदार विद्यार्थी उपस्थित होते.
महापालिकेच्या स्वीप कक्षाच्या वतीने विविध महाविद्यालयांमध्ये जाऊन जनजागृती करण्यात येत आहे. मतदार जनजागृतीपर संगीत नृत्याचे सादरीकरण जीएनडी ग्रुपच्या बाल कलाकारांद्वारे करण्यात येत आहे.
आकर्षक नृत्य व चित्तथरारक शारीरिक कवायती या बाल कलाकारांकडून सादर करण्यात येत आहेत. लोकशाहीच्या उत्सवात सहभागी तसेच समाजाच्या उज्वल भविष्यासाठी सर्व नवमतदार आणि मतदारांनी आपला मताचा अधिकार नक्की बजावावा. महाविद्यालयातील सर्व मतदारांनी आपल्या परिसरात मतदान करण्यासाठी जनजागृती करावी असे, आवाहन प्राचार्य डॉ. जनार्धन पवार यांनी केले.