कारवाई टाळण्यासाठी लावली होती बनावट नंबरप्लेट
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : नो पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी उचलून आणल्याने तरुण-तरुणीने डेक्कन वाहतूक विभागाच्या कार्यालयासमोर गोंधळ घातला. वाहतूक अडवून ठेवली. सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार यांना शिवीगाळ करुन नोकरी घालविण्याची धमकी दिली. त्याचवेळी दुचाकीवर बँकेची, तसेच पोलीस कारवाई टाळण्यासाठी बनावट नंबरप्लेट लावल्याचे उघडकीस आले आहे.
याबाबत सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद डोंगरे यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी गणेश कोंडीभाऊ सहाणे आणि सोनम सहाणे (दोघे रा. वाघारे कॉलनी, मोरवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहतूक पोलिसांनी दोन दुचाकी उचलून मॉडर्न कॉलेजसमोरील डेक्कन वाहतूक विभागाच्या आवारात आणल्या होत्या. या कारवाईचा त्यांना राग आला. तसेच या दुचाकींवरील प्रलंबित दंड पेड न करण्याच्या उद्देशाने त्यांनी डेक्कन वाहतूक विभाग कार्यालयाच्या आवारात व विभागाच्या समोरील सार्वजनिक रोडवर गोंधळ घातला.
रोडवरील वाहतूक अडवून ठेवली. वाहतूक पोलीस समजाविण्यास गेले असता सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस अंमलदार यांना वाईट बोलून नोकरी घालविण्याची धमकी दिली. सरकारी कर्तव्य करण्यास अटकाव केला.
गणेश सहाणे याने त्याच्या दुचाकीवर बँकेची तसेच पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी जाणीवपूर्वक बनावट वाहन क्रमांक लावून बनावटीकरण करुन शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे करीत आहेत.