पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केली कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येरवडा परिसरातील रेकॉर्डवरील गुंडांच्या गुन्हेगारीवर निर्बंध ठेवण्यासाठी पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी टोळी प्रमुख व त्याचे सदस्य असलेल्या ४ सराईत गुन्हेगाराना एका वर्षासाठी तडीपार केले आहे.
टोळीप्रमुख वनराज महेंद्र जाधव (वय २१, रा. लक्ष्मीनगर, येरवडा), टोळी सदस्य यशराज आनंद इंगळे (वय २३, रा. लक्ष्मीनगर, येरवडा), हिमालय ऊर्फ गोलु मिटु बिस्ट (वय २१, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) आणि मयुर विष्णु गुंजाळ (वय २६, रा. वडारवस्ती, शनिआळी, येरवडा) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत.
येरवडा पोलीस स्टेशनमधील रेकॉर्डवरील टोळीप्रमुख, टोळीसदस्य हे खुनशी व धोकादायक प्रवृत्तीचे असून त्यांच्याविरुद्ध खुन, दंगा करणे, गंभीर दुखापत करणे, तोडफोड करणे, घात हत्यार बाळगणे, शिवीगाळ करणे, हाताने मारहाण करणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
या गुन्हेगारांवर कायद्याचा वचक रहावा, यासाठी येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी त्यांच्यावर तडीपार कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांच्याकडे पाठविला.
जाधव यांनी या प्रस्तावाची पडताळणी करुन चौघांना पुणे शहर, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्याचा आदेश दिला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, गुन्हे निरीक्षक पल्लवी मेहेर आणि स्वाती खेडकर, निगराणी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक महेश फटांगरे, पोलीस उपनिरीक्षक सुर्वे, पोलीस हवालदार सचिन माळी, सचिन शिंदे, पोलीस अंमलदार मोनिका पवार यांनी केली आहे.