आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

भारतीय जैन संघटनेचे ‘राष्ट्रीय अधिवेशन’ पुणे येथे संपन्न होणार

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW - Social News, MJW Daily News(Post Slider), News, News Slider, Social • November 26, 2024
Spread the love

पुणे : मागील चाळीस वर्षांपासून सामाजिक-कौटुंबिक समस्या, सामूहिक विवाह, महिला सक्षमीकरण, आपत्ती प्रतिसाद व व्यवस्थापन, जलस्त्रोत विकास, आपत्तीग्रस्त विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पुनर्वसन आदी क्षेत्रांत कार्यरत असलेल्या देशातील अग्रगण्य सामाजिक संस्था भारतीय जैन संघटनेचे (बीजेएस) ‘राष्ट्रीय अधिवेशन’ दि. ३० नोव्हेंबर व १ डिसेंबर २०२४ रोजी वर्धमान सांस्कृतिक भवन, बिबवेवाडी, पुणे येथे संपन्न होणार आहे.

दर दोन वर्षांनी होणार्‍या या राष्ट्रीय अधिवेशनासाठी देशभरातील मान्यवर राजकीय नेते, प्रसिद्ध उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ आणि बीजेएसचे तीन हजार कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

या अधिवेशनात उद्घाटन सत्राबरोबरच अनेक सत्र, थेट संवाद, सांस्कृतिक कार्यक्रम, शपथविधी असा भरगच्च दोन दिवसीय कार्यक्रम होणार आहे. यात देशभरातून आलेले तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. बदलती जीवनशैली आणि काळानुसार जैन समाजासमोर निर्माण झालेल्या अनेक गुंतागुंतीच्या समस्यांवर, जसे की कौटुंबिक, सामाजिक व वैवाहिक प्रश्न, विचारमंथन होऊन त्यावरील उपायांवर सविस्तर चर्चा होणार आहे.

तसेच नव्या पिढीला समजेल अशा त्यांच्याच भाषेत बीजेएसने तयार केलेल्या खास कार्यक्रमांचे सादरीकरण होईल. त्याचबरोबर नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा शपथविधी आणि सहभागी राज्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमही संपन्न होतील.

विशेष म्हणजे संस्थेच्या कार्याची व्याप्ती देशभर पसरलेली असून संस्थेशी जोडले गेलेले अनेक राज्यांतील हजारो समर्पित कार्यकर्ते यात सहभागी होणार आहेत. “बेंगळुरू, चेन्नई, उदयपूर येथील राष्ट्रीय अधिवेशन यशस्वीपणे संपन्न झाल्यानंतर यावर्षी पुणे शहर या अधिवेशनासाठी सज्ज झाले आहे. मागील तीन-चार महिन्यांपासून या अधिवेशनाच्या तयारीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

यात देशभरातील बीजेएसचे ३,००० कार्यकर्ते आणि प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. मागील अधिवेशनांप्रमाणेच हे अधिवेशन ऐतिहासिक होईल, याबद्दल शंका नाही,” असा विश्वास भारतीय जैन संघटनेचे संस्थापक श्री. शांतिलाल मुथ्था यांनी व्यक्त केला.