दुकानदाराकडून ४ लाख ३९ हजारांचे बनावट कपडे जप्त
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : लिव्हाईस या नामांकित कंपन्यांचे बनावट कपड्यांची विक्री करणार्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकला. दुकानदाराकडून लिव्हाईस कंपनीचे ४ लाख ३९ हजार रुपयांचे बनावट कपडे जप्त करण्यात आले आहे.
पुण्यात लिव्हाईस या नामांकित कंपनीचे बनावट कपड्यांची विक्री होत असल्याची माहिती कंपनीचे फिल्ड अधिकारी राकेश राम सावंत यांना मिळाली. त्यांनी ही माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांना कळवून कारवाईकरीता मदत मागितली.
युनिट ३ च्या अधिकारी व अंमलदार यांनी एरंडवणा येथील ब्रँड काईड क्लोदिंग या दुकानावर छापा टाकला. दुकानात पॅन्ट, शर्ट व टि शर्टवर लिव्हाईस या कंपनीचे बनावट टॅग लावून विक्री होत असल्याचे आढळून आले.
दुकानात ३ लाख ५४ हजार रुपयांचे लिव्हाईस कंपनीचे एकूण ११८ पॅन्ट, ३७ हजार ५०० रुपयांचे १५ शर्ट, ४८ हजार रुपयांचे २४ टि शर्ट असा एकूण ४ लाख ३९ हजार रुपयांचा लिव्हाईस कंपनीचा बनावट माल मिळून आला.
दुकानदाराकडे चौकशी केली असता त्यांनी हा माल बंगलोर आणि आंध्र प्रदेशातील नेलोर येथून ऑनलाईन मागविला असल्याचे समजले आहे. दुकानमालकाविरुद्ध अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगराव पवार, सहायक निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे,पोलीस अंमलदार संजीव कळंबे, विनोद भंडलकर, राकेश टेकावडे यांनी केली आहे.