दहशतवाद विरोधी पथकाने केली होती अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : कोंढव्यात बेकायदेशीरपणे टेलिफोन एक्सचेंज चालविणाऱ्या अब्दुल कासिम सिद्धीकी याला दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली होती. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस एच वानखेडे यांनी त्याची जामीनावर मुक्तता केली आहे. अब्दुल कासिम अब्दुल मन्नान सिद्धीकी ऊर्फ रेहान शेख (वय ३४, रा. पिराणीवाडा, शांतीनगर रोड, भिवंडी, ठाणे) असे या मुख्य आरोपीचे नाव आहे.
कोंढवा येथील एम ए कॉम्प्लेक्समध्ये भाड्याच्या खोलीत सुरू असलेल्या बेकायदेशीर आंतरराष्ट्रीय टेलिफोन एक्सचेंजवर छापा टाकून दहशतवादविरोधी पथकाने नौशाद अहमद सिद्धीकी याला अटक केली होती.
या गुन्ह्यात नौशाद अहमद सिद्धीकी ऊर्फ कुमार (वय ३२, रा. मिठानगर, मूळ रा. संत कबीरनगर, उत्तर प्रदेश), मोहम्मद उजैर सौकत अली अन्सारी ऊर्फ सोनू (वय २९, रा. भिवंडी, ठाणे), अब्दुल कासिम अब्दुल मन्नान सिद्धीकी ऊर्फ रेहान शेख, प्रविण गोपाळ श्रीवास्तव (वय २९, रा. साई निवास, लखनौ, उत्तर प्रदेश) यांना अटक करण्यात आली आहे.
नौशाद अहमद सिद्धीकी याने काही वर्षांपासून परदेशातून येणारे आंतरराष्ट्रीय कॉल त्यांच्या उपकरणाद्वारे भारतातील इच्छित मोबाईलवर वळवून भारत सरकारची फसवणूक केली होती. अब्दुल कासिम सिद्धीकी याचे इतर आरोपींसोबत आर्थिक व्यवहार होते.
ही रक्कम आरोपीस बेकायदेशीर टेलिफोन एक्सचेंज चालविण्यासाठी तसेच सिम कार्डचे ओटीपी देण्यासाठी प्राप्त झाल्याचे निष्पन्न झाले आहे. बेकायदेशीर टेलिफोन एक्सचेंज चालवण्यासाठी भाड्याने फ्लॅट, सिम कार्ड्स, सिम बॉक्स व इतर साहित्य, इंटरनेट कनेक्शन, लॅपटॉप, फोन, आणि जप्त सिम कार्ड चालू ठेवण्यासाठी रिचार्ज पुरविण्यात आले.
आरोपीने फरार आरोपी अनुराग ऊर्फ पर्ल ऊर्फ एआयओ याच्या संपर्कात राहून, त्याला बनावट व्हॉट्सअॅप तयार करण्यासाठी ओटीपी लिस्ट तयार करून पाठवली. ही लिस्ट पियुष गजभियेच्या मदतीने तयार करण्यात आली.
सिम कार्ड आणि टेलिफोन एक्सचेंज व बेसिक फोन वापरण्याची अनुमती देऊन आरोपीने अनुरागकडून क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून यूएसडीटी स्वरूपात रक्कम मिळवली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींनी बेकायदेशीर टेलिफोन एक्सचेंज चालवून भारत सरकारला ५६ लाख ५७ हजार २२२ रुपयांचे नुकसान केले आहे.
गुन्ह्यातील काही आरोपी अजूनही फरार आहेत. तसेच काही आंतरराष्ट्रीय टेलिफोन एक्सचेंज अजूनही चालू असल्याची शक्यता आहे. जर आरोपीला जामीन दिला गेला, तर तो क्रिप्टोकरन्सीच्या पुराव्यात हस्तक्षेप करू शकतो. तसेच जामीन मिळाल्यास तो फरार होऊ शकतो. त्यामुळे आरोपीला जामीन देण्यात येऊ नये, असा युक्तिवाद सरकारी पक्षाच्या वतीने करण्यात आला.
आरोपीच्या वतीने अॅड. विजयसिंह ठोंबरे यांनी युक्तिवाद केला की, या गुन्ह्याचा तपास पूर्ण झाला आहे आणि आरोपीकडून आणखी काही जप्त करायचे नाही. या गुन्ह्यात सात वर्षांची शिक्षा होऊ शकते. यातील इतर तीन आरोपींना आधीच जामीन मंजूर करण्यात आला आहे.
त्यामुळे अब्दुल कासिम सिद्धीकी याला ५० हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. तसेच, दर सोमवारी व शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेदरम्यान तपास अधिकाऱ्यांसमोर हजेरी देण्याच्या अटीवर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.