महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : भारताच्या GDP मध्ये जैन समाजाचे मोठे योगदान आहे. भारताच्या ५ ट्रिलियन इकॉनॉमीच्या मार्गावर जैन समाजाचे महत्त्वाचे योगदान आहे. भगवान महावीर आणि सर्व तीर्थंकरांनी दिलेल्या तत्त्वांमध्ये “घेण्यापेक्षा देण्याची” भावना आहे. त्यामुळेच जैन समाज हा घेणारा नाही तर देणारा समाज म्हणून ओळखला जातो. या दृष्टीकोनातून भारतीय जैन संघटना (बीजेएस) समर्पण भावनेने काम करत आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
भारतीय जैन संघटनेच्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनात दुसऱ्या सत्रात जलसंधारण या विषयावर चर्चासत्र पार पडले. यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते. या चर्चासत्रात अभिनेते आमिर खान, शांतिलाल मुथ्था आणि इतर मान्यवरांनी सहभाग घेतला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “बीजेएसने जमीनीवर उतरून कार्य केले आहे. महाराष्ट्रात पाणी फाऊंडेशन आणि बीजेएसने जलसंधारणाचे केलेले काम लोकांना एकत्र आणून त्यांना जागरूक करण्याचे काम केले आहे. हे समाजपरिवर्तन बीजेएस आणि पाणी फाऊंडेशनने साधले आहे.
यामुळे नक्कीच गावे सुजलाम सुफलाम होतील आणि हजारो गावे पाण्याने परिपूर्ण होतील. बीजेएसचे हे काम निश्चितच दिशादर्शक आहे.” “मूल्य शिक्षणासाठी पुस्तके तयार करून शालेय शिक्षणात मूल्य शिक्षणाचा प्रयोग शांतिलाल मुथ्था यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील सरकारी शाळांमध्ये यशस्वी केला आहे. बीजेएसचे हे मॉडेल आता देशभर राबविले जाणार आहे.
केव्हाही काहीही मदत लागली तर मी संपूर्णपणे बीजेएसच्या पाठीशी नेहमीप्रमाणे उभा राहीन,” असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अभिनेते आमिर खान म्हणाले, “सत्यमेव जयते या कार्यक्रमातून अनेक सामाजिक समस्या पुढे आल्या.
त्यातून एखाद्या समस्येवर ठोस उपाय शोधण्याच्या उद्देशाने पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून वॉटर कप स्पर्धेला सुरुवात झाली. महाराष्ट्रात गंभीर पाणीटंचाई निर्माण झाली होती. मी मुंबई आणि महाराष्ट्राचा असल्याने या स्पर्धेला महाराष्ट्रात सुरुवात केली.”
“खरंतर समाजाकडे संवेदनशीलतेने पाहण्याची दृष्टी मला माझ्या आईकडून मिळाली. त्यादृष्टीनेच काम करत आहे. महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याच्या दिशेने आम्ही सुरुवात केली, आणि बीजेएस व पाणी फाऊंडेशन मिळून महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने हे कार्य पूर्ण करतील,” असेही आमिर खान यांनी सांगितले.
“पुढील पाच वर्षांत आमिर खान यांच्या पाणी फाऊंडेशनसोबत जलसंधारणाचे काम करून महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी बीजेएस पूर्ण ताकदीने काम करेल,” असा विश्वास बीजेएसचे संस्थापक शांतिलाल मुथ्था यांनी व्यक्त केला.
