भारतीय जैन संघटनेच्या अधिवेशनाला सुरुवात
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात गेल्या चाळीस वर्षांपासून शांतिलाल मुथ्था आणि भारतीय जैन संघटनेने मोठे योगदान दिले आहे. देशात जेव्हा जेव्हा समस्या निर्माण झाली, त्यावेळी जैन समाजाने ती समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. भविष्यात जल, जंगल, आणि जमिनीच्या संवर्धनासाठी भारतीय जैन संघटनेचे मोठे योगदान राहील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केला.
भारतीय जैन संघटनेच्या द्विवार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतिलाल मुथ्था, उद्योजक प्रकाश धारिवाल, गणपत चौधरी, विजय दर्डा, विठ्ठल मणियार, जितोचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष विजय भंडारी, राजेंद्र लुंकड, वालचंद संचेती, राजेश मेहता, वल्लभ भन्साळी, डॉ. चैनराज जैन, सरला मुथ्था, कोमल जैन आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच देशभरातून आलेले बीजेएसचे कार्यकर्तेही उत्साहात राष्ट्रीय अधिवेशनात सहभागी झाले होते.
शरद पवार म्हणाले की, “सेवा करण्यासाठी जैन समाज कायम प्रयत्नशील आहे. जैन संघटनेचा सामाजिक सेवेत ४० वर्षांहून अधिक काळाचा प्रवास आहे. समाजातील सर्व पंथांनी एकत्र येऊन मोठे सामाजिक काम उभे केले आहे. देशात जेव्हा समस्या निर्माण होते, तेव्हा ती सोडवण्यासाठी ते सगळ्यात आधी पुढे येतात.”
“लातूर भूकंपाच्या वेळी मी तिथे जाऊन सगळी पाहणी केली होती. अन्न, निवास, वैद्यकीय सुविधा, आणि मुलांचे शिक्षण या समस्या गंभीर होत्या. त्या वेळी शांतिलाल मुथ्था यांनी मोठे कार्य उभे केले. त्यानंतर गुजरातमध्येही संघटनेने मोठे योगदान दिले. गावा-गावांत फिरून समस्या जाणून घेतल्या आणि पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा, अन्न, आणि वैद्यकीय सुविधांसह विविध समस्या सोडविल्या. त्यात पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेला विशेष प्राधान्य दिले. शिक्षण क्षेत्रातही संघटनेने चांगले कार्य केले आहे.”
संस्थापक शांतिलाल मुथ्था म्हणाले की, “कोरोनाच्या काळात भारतीय जैन संघटनेने देशभरात सर्वाधिक काम केले. संकटाच्या काळात जैन समाज नेहमीच पुढे असतो. भविष्यातही सामाजिक कार्य सातत्याने सुरूच राहील.”
विजय भंडारी म्हणाले की, “देशात येणाऱ्या प्रत्येक संकटात जैन संघटना काम करत असते. समाजातील प्रत्येक व्यक्तीला चांगला नागरिक बनवण्यासाठी प्रयत्नशील राहते. आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक, गोशाळा आणि संस्कार क्षेत्रात संघटना अग्रेसर आहे.”
मी अजून तरुणच : शरद पवार
सूत्रसंचालकांनी शरद पवार हे ८४ वर्षांचे असूनही अजूनही तितक्याच जोशाने काम करत असल्याचे नमूद केले. त्यावर भाषणाला उभे राहून पवार मिश्कीलपणे म्हणाले, “कोण म्हणतं मी ८४ वर्षांचा आहे? मी अजून तरुणच आहे.” त्याला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.
देशाच्या आर्थिक विकासात जैन समाजाचे मोठे योगदान : मुरलीधर मोहोळ
देशाच्या आर्थिक विकासात जैन समाजाचे मोठे योगदान आहे. समाज एकविचाराने राहतो. सर्वांनी एकत्रित सातत्याने काम केले, तर मोठे कार्य उभे राहते. त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जैन समाज आहे. जैन संघटनेमध्ये कार्य करणारे लोक प्रेमळ आणि सुसंस्कृत आहेत. भविष्यात प्रत्येक चांगल्या कार्यात आम्ही तुमच्यासोबत राहू, अशी ग्वाही केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
