महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : भारतीय जैन संघटनेच्या द्विवार्षिक राष्ट्रीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पुढील दोन वर्षांसाठी (२०२५-२६) निवडलेल्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा आणि अकरा राज्यांच्या कार्यकारिणीचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. नाशिकच्या साखलाज उद्योग समूहाचे अध्यक्ष नंदकिशोर साखला यांची बीजेएसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
या प्रसंगी बीजेएसचे संस्थापक शांतिलाल मुथ्था, मावळते अध्यक्ष राजेंद्र लुंकड, प्रफुल्ल पारख, मॅनेजिंग डायरेक्टर कोमल जैन आदी मान्यवरांच्या उपस्थितीत साखला दांपत्याचा भव्य सत्कार समारंभ तसेच मावळत्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा निरोप समारंभही संपन्न झाला.
राष्ट्रीय कार्यकारिणीत राष्ट्रीय उपाध्यक्षपदी गौतम बाफना, संप्रती संघवी, संजय सिंघी यांची निवड करण्यात आली आहे. तर नॅशनल जनरल सेक्रेटरीपदी पंकज चोपडा, दिनेश पालरेचा, प्रदीप संचेती, दीपक चोपडा, विलास राठोड, ग्यानचंद अचलिया, श्रीपाल खेंप्लापुरे, निरंजन जुआ जैन, ओम लुनावत, रमेश पटवारी, विजय जैन, राहुल नाहाटा, आदेश चंगेडिया यांची निवड करण्यात आली आहे. तसेच इतर मान्यवरांचा या कार्यकारिणीत समावेश आहे.
अधिवेशनात आलेल्या सर्व प्रतिनिधींनी समाजकार्यास स्वतःला वाहून घेण्याची शपथ घेतली. शांतिलाल मुथ्था यांनी सर्वांना शपथ दिली. तसेच आगामी काळात भारतीय जैन संघटनेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. प्रत्येक शाखा, जिल्हा, राज्य कार्यकारिणी आणि देशपातळीवर हे कार्यक्रम मोठ्या ताकदीने राबविण्यात येणार आहेत.
“बीजेएसमध्ये ३८ वर्षांपासून कार्यकर्ता ते राष्ट्रीय अध्यक्ष असा नंदकिशोर साखला यांचा प्रवास राहिला आहे. खूप तळमळ आणि जिद्दीने काम करणारा हा कार्यकर्ता मोठ्या ताकदीने आगामी काळात बीजेएसचे समाजसेवेचे व्रत पुढे नेईल, याचा पूर्ण विश्वास आहे.” – शांतिलाल मुथ्था, संस्थापक, बीजेएस
“माझ्या माताजी-पीताजी यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे मी समाजकार्यात सक्रिय राहू शकलो. तसेच भारतीय जैन संघटना आणि जैन स्थानकात केलेल्या सेवाकार्यामुळे, तसेच शांतिलाल मुथ्था यांच्या मार्गदर्शनामुळे मी नेहमीच सेवाकार्यात राहू शकलो. येत्या काळात मोठ्या ताकदीने बीजेएसचे कार्यक्रम राबविणार आहे. तसेच देशाच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणार आहोत.” – नंदकिशोर साखला, राष्ट्रीय अध्यक्ष, बीजेएस
