चुडामण तालीम चौकातील घटना
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : कोयते घेऊन दोन दुचाकीवरून पाच जण कोणाचा तरी “गेम” करण्यासाठी जात होते. मात्र, वाटेत पोलिसांना पाहून त्यांची तंतरली आणि त्यांनी गाड्या तेथेच टाकून पळ काढला. ही घटना भवानी पेठेतील चुडामण तालीम चौकातील इनामदार हॉस्पिटलच्या समोर शुक्रवारी दुपारी २ वाजता घडली.
या संदर्भात पोलीस अंमलदार निखील चंदनशिवे यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अंमलदार निखील चंदनशिवे व मयूर भिसे हे काशेवाडी भागात शुक्रवारी दुपारी पेट्रोलिंग करत होते.
त्यावेळी दोन दुचाकीवरून २० ते २२ वयोगटातील पाच जण तेथे उतरले. त्यांच्यापैकी एकाने गाडीच्या डिक्कीतून कोयता बाहेर काढला. दुसऱ्या बर्गमॅन गाडीवरून उतरलेल्या तरुणाच्या हातातही कोयता होता. हे पाहून पोलिसांनी त्यांच्या गाड्यांवरून उतरून त्या तरुणांकडे जाण्यास सुरुवात केली. यावेळी बर्गमॅन गाडीवरून उतरलेला तरुण हातात कोयता घेऊन पळू लागला.
त्याच्या सोबत असलेल्या दुचाकीवरील तरुणाने तातडीने गाडीच्या डिक्कीत कोयता ठेवला आणि दोन्ही गाड्या तेथेच टाकून पाचही जण पळून गेले. घटनास्थळी दोन दुचाकी, एक कोयता, दोन बॅगा, व चार ओळखपत्रे सापडली. हे सर्व जण कोणताही गुन्हा करण्याच्या उद्देशाने जात असताना पोलिसांना पाहून पळून गेले. शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा पोलिसांनी त्यांच्यावर दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगळे करत आहेत.
