बंडगार्डन पोलिसांची कामगिरी : वाढदिवस साजरा करण्यासाठी उकळली होती खंडणी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : स्वारगेटहून पुणे स्टेशनला घेऊन जाताना शेअर रिक्षातील चौघांनी प्रवाशाला मारहाण करून पत्नीकडून २५ हजार रुपये मागवून लुटणाऱ्या चौघांना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे.
गणेश आण्णा जगधने (वय २९, रा. डायस प्लॉट कॅनॉल, गुलटेकडी), अमोल उत्तम गायकवाड (वय ३२, रा. डायस प्लॉट कॅनॉल, गुलटेकडी), अतुल रवींद्र गायकवाड (वय ३८) आणि संतोष राधाकिसन सरोदे (वय ३१, सर्व रा. डायस प्लॉट कॅनॉल, गुलटेकडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत धनिष कुमार हेरेंद्र प्रसाद (वय २२, रा. डेक्कन, मूळ रा. बिहार) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या गावाकडील सत्येंद्र महतो (वय ४१, रा. शंकरपूर टोला, चकीया, सिवान, बिहार) हा मित्र असून तो मागील एक वर्षांपासून सेंट्रिंगचे काम करतो.
सत्येंद्र महतो हा गावी जाण्यासाठी २२ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार वाजता स्वारगेटवरून पुणे स्टेशनला जात होता. त्यावेळी एका रिक्षाचालकाने पुणे स्टेशनला जायचे आहे का, असे विचारले. ते रिक्षात बसल्यानंतर आणखी तिघेजण रिक्षात बसले. काही अंतर गेल्यानंतर तिघांनी त्याला मारहाण करून पैसे मागितले. पैसे नाहीत म्हटल्यावर बायकोकडून पैसे मागविण्यास सांगितले.
त्यांनी बायकोला फोन लावल्यानंतर या चोरट्याने, “तुमच्या नवऱ्याने माझा फोन फोडला. भरपाई म्हणून २५ हजार रुपये द्या, नाहीतर त्याला मारतो,” असे सांगितले. घाबरून बायकोने त्याने पाठविलेल्या स्कॅनरवर २५ हजार रुपये पाठविले. त्यानंतर त्याला सोडून दिले. गावी जाण्यासाठी रेल्वे असल्याने तो गावी गेल्यावर फिर्यादीने तक्रार दिली.
बंडगार्डन पोलिसांनी तांत्रिक तपास व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा गुलटेकडी परिसरात शोध घेतला. त्यातून गणेश जगधने आणि अमोल गायकवाड यांना पकडले. त्यांच्याकडील चौकशीतून अन्य दोघांना अटक करण्यात आली. त्यांनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली रिक्षा व गुन्ह्यातील खंडणीपैकी १० हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. अधिक चौकशीत त्यांनी वाढदिवस साजरा करण्यासाठी प्रवाशाला लुटल्याचे सांगितले.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहायक पोलीस आयुक्त संगिता आल्फान्सो शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता, पोलीस अंमलदार प्रदीप शितोळे, सारस साळवी, प्रकाश आव्हाड, महेश जाधव, ज्ञानेश्वर बडे, मनिष संकपाळ, मनोज भोकरे, शिवाजी सरक, ज्ञानेश्वर गायकवाड यांनी केली.

















