नांदेड सिटी पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : सिंहगड रोड परिसरातील आंबाईदरा येथे येणाया सराईत गुन्हेगारांना नांदेडसिटी पोलिसांनी पकडले़ त्यांच्याकडून २ गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आले़
साजन विनोद शहा (वय १९, रा. पोकळे क्रिस्टल बिल्डिंग, धायरीगाव) आणि कुणाल शिवाजी पुरी (वय १८, रा. विश्व कॉर्नर बिल्डिंग, धायरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. साजन शहा हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, दरोडा, मारामारीचे ६ गुन्हे दाखल आहेत.
नांदेड सिटी पोलीस ठाण्यातील तपास पथक सिंहगड रोड परिसरात गस्त घालत असताना पोलीस अंमलदार पुरुषोत्तम गुन्ला व योेगेश झेंडे यांना बातमीदाराकडून बातमी मिळाली की, सराईत गुन्हेगार साजन शहा व कुणाल पुरी यांच्याकडे गावठी पिस्टल असून ते आंबाईदरा येथे येणार आहेत.
त्यानुसार पोलिसांनी आंबाईदरा येथे सापळा लावून साजन शहा व कुणाल पुरी यांना पकडले. त्यांच्याकडून ७० हजार ५०० रुपयांचे २ गावठी पिस्टल व १ जिवंत काडतुस जप्त केले आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड सिटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बुनगे, पोलीस अंमलदार पुरुषोत्तम गुन्ला, योगेश झेंडे, राजू वेगरे, अक्षय जाधव, प्रशांत काकडे यांनी केली आहे.