पोस्ट चौकातील इंडियन बेकरीच्या पाडापाडीला स्थगिती
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : पोस्ट चौकाजवळील रेल्वे लाईनलगत असलेल्या शशिकला नवगण यांच्या ताब्यातील “इंडियन बेकरी” या बांधकामाच्या पाडापाडीस बार्शीच्या दिवाणी न्यायालयाने स्थगिती दिली आहे. अॅड. प्रशांत शेटे यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या युक्तिवादानंतर न्यायालयाने १८ डिसेंबर २०२४ रोजी बार्शी नगरपालिकेच्या हालचालींना स्थगिती आदेश दिला.
श्रीमती शशिकला नवगण या भवानी पेठ, बार्शी येथील रहिवासी असून, त्या पोस्ट चौकाजवळील सी.एस. नंबर २८५९ए या जागेवर “इंडियन बेकरी” नावाचा व्यवसाय मागील ७० वर्षांपासून चालवत आहेत. जागेवर शॉप अॅक्ट परवाना, वीज मीटर तसेच भोगवटादार म्हणून नोंद आहे.
त्रयस्थ व्यक्तींनी नगरपालिकेस दिलेल्या तक्रारीवर नगरपालिकेने सदर बांधकाम पाडण्याची तयारी दर्शविली. याविरोधात सागर नवगण यांनी हरकत अर्ज दाखल केला. न्यायालयात वादीच्या वतीने अॅड. शेटे यांनी युक्तिवाद केला की, “नवगण या विधवा महिला असून त्या जागेचा कायदेशीर उपभोग घेत आहेत”.
“सदर जागा सन २००० पूर्वीपासून त्यांच्या ताब्यात आहे.” “जागा सरकारी आहे; ती नगरपालिकेच्या मालकीची नाही.” “वादी नियमित कर भरत असल्याने त्या अतिक्रमणधारक नाहीत.” न्यायालयाने वादीचा युक्तिवाद मान्य करत नगरपालिकेला कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर कारवाई अथवा पाडापाड करण्यास स्थगिती दिली आहे.