बार्शीतील प्रवाशांना दिलासा, खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रयत्नांना यश
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : टेंभुर्णी-लातूर रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी ५७४ कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिली. हा महामार्ग सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी, कुडूवाडी, बार्शी, पांगरी तसेच धाराशिव जिल्ह्यातील येडशी, तडवळा, ढोकी आणि लातूर जिल्ह्यातील मुरुड या महत्त्वाच्या बाजारपेठांना जोडणारा आहे. बार्शी शहरातून पश्चिम महाराष्ट्राशी थेट जोडणारा हा मार्ग प्रवाशांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
टेंभुर्णी-लातूर रस्त्याच्या चौपदरीकरणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी खासदार निंबाळकर यांनी १८ डिसेंबर २०२४ रोजी भेट घेतली होती. लोकसभा अधिवेशनातही त्यांनी हा विषय सातत्याने मांडला.
केंद्रीय रस्ते दळणवळण मंत्री गडकरी यांनी या प्रकल्पासाठी ५७४ कोटी रुपयांची मंजुरी दिली असल्याची माहिती निंबाळकर यांनी दिली. टेंभुर्णी-लातूर चौपदरीकरण संघर्ष समितीने यासाठी सातत्याने आंदोलने केली होती. नागपूर येथे आमरण उपोषणही करण्यात आले. या संघर्षामुळे रस्त्याच्या चौपदरीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
लातूर आणि पश्चिम महाराष्ट्राशी थेट संपर्कासाठी हा महामार्ग उपयुक्त ठरणार आहे. शिक्षण आणि व्यापारासाठी लातूरला जाणाऱ्या प्रवाशांना वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे. पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्याला जोडणाऱ्या या महामार्गामुळे दळणवळण सुलभ होणार आहे.
खा. निंबाळकर यांनी लोकसभेत तारांकित प्रश्न आणि लक्षवेधी सूचना मांडून सरकारचे लक्ष वेधले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासोबत बैठका घेऊन प्रकल्पाला गती दिली. या प्रकल्पाच्या मंजुरीमुळे बार्शी आणि परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.