सोलापूरमध्ये 24 हजार किलो सुपारीसाठा जप्त, निकृष्ट दर्जावरून कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
सोलापूर : सोलापूर येथील विजापूर रोडवरील नांदणी टोल नाका, ता. दक्षिण सोलापूर येथे अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. टाटा कंपनीच्या 12 टायर वाहन (क्रमांक आर.जे-11-जीसी-9118) तपासणीदरम्यान 24,498 किलो वजनाची रंगमिश्रित व निकृष्ट दर्जाची सुपारी सापडली. जप्त साठ्याची एकूण किंमत 69 लाख 45 हजार 183 रुपये इतकी असल्याचे समोर आले आहे.
सहायक आयुक्त (अन्न) साहेबराव देसाई यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती अस्मिता टोणपे यांनी रंगमिश्रित व कीटकबाधित सुपारीचा नमुना विश्लेषणासाठी घेतला आहे.
उर्वरित 24,498 किलो सुपारी कमी दर्जाच्या संशयावरून जप्त करण्यात आली. सुपारीच्या नमुन्यावर अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत तपास सुरू असून, संबंधित साठ्याचा मालक व वाहतूकदारावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
सदर कारवाई सहायक आयुक्त साहेबराव देसाई, अन्न सुरक्षा अधिकारी अस्मिता टोणपे, आणि नमुना सहायक श्रीशैल हिटनळ्ळ्ळी यांच्या पथकाने केली. अन्न व औषध प्रशासनाने अशा प्रकारच्या रंगमिश्रित व निकृष्ट अन्नपदार्थांवर कडक कारवाई सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
या कारवाईमुळे सोलापूर जिल्ह्यात अन्न सुरक्षा नियमांची कडक अंमलबजावणी होत असल्याचे दिसून आले आहे. रंगमिश्रित व निकृष्ट दर्जाच्या पदार्थांचा साठा उघड झाल्याने अन्न प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
