अंमली पदार्थ विरोधी पथकाने लोहगाव येथे केला ८१६ ग्रॅम गांजा जप्त
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : लोहगाव येथील शिवशंभो स्रॅक सेंटर जवळ मोकळ्या जागेत थांबून गांजा विक्री करत असलेल्या तरुणाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. त्याच्याकडून २१ हजार ३२० रुपयांचा ८१६ ग्रॅम गांजा, मोबाईल, छोट्या प्लॉस्टिक पिशव्या असा माल जप्त केला आहे.
आकाश तुकाराम जाधव (वय २३, रा. भारतमातानगर, लोहगाव, मुळ रा. देवानगर, ता. लोणार, बुलढाणा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी लोहगाव येथील शिवशंभो स्नॅक सेंटरच्या शेजारी बंद पत्र्याचे शेडलगत मोकळया जागेत एक तरुण थांबला असून त्याच्या हातामध्ये नायलॉनची पिशवी असून कोणाची तरी वाट पहात आहे, अशी माहिती मिळाली.
पोलिसांनी तात्काळ तेथे जाऊन त्या आकाश जाधव याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील पिशवीत १६ हजार ३२० रुपयांचा ८१६ ग्रॅम गांजा, मोबाईल व छोट्या ४६ प्लॉस्टिकच्या पिशव्या आढळून आल्या.
ही कामगिरी सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार सुजित वाडेकर, ज्ञानेश्वर घोरपडे, विनायक साळवे, संदिप शिर्के, प्रविण उत्तेकर, दत्ताराम जाधव, विपुल गायकवाड, रेहाना शेख यांनी केली आहे.
