कर्ज झाल्याने केला होता बनाव, स्वत:च केला आत्महत्येचा प्रयत्न
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : कात्रज घाटात गोळीबार झाला असून एक तरुण जखमी असल्याचे पोलिसांना समजले. त्यांनी त्या तरुणाला रुग्णालयात दाखल केले. त्याने आपल्यावर दोघांनी गोळीबार करुन लुटल्याचे सांगितले.
सोमवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कात्रज घाटात धाव घेतली. तेथे एक पिस्तुलही सापडले. त्यातून गोळी झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत होते. त्यामुळे या प्रकाराचे गांभीर्य आणखीच वाढले. परंतु, आणखी काही पुरावा मिळत नव्हता. तेव्हा पोलिसांनी या तरुणाला पुन्हा विश्वासात घेऊन विचारपूस केली.
तेव्हा तो गडबडला. त्याने आपल्यावर हल्ला झाला नसून आपण कर्जाला कंटाळून आत्महत्येचे प्रयत्न केल्याचे सांगितले. दीपक राजू लुकट (वय ४४, रा. औंध) असे या तरुणाचे नाव आहे. तो औंध येथील हॉस्पिटलमध्ये वॉड बॉय म्हणून काम करतो.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सोमवारी रात्री कात्रज येथे मार्शल हे पेट्रोलिंग करत असताना घाटात एक तरुण जखमी असल्याचे समजले. मार्शलने त्याला रुग्णालयात दाखल केले. त्याच्या छातीजवळ गोळी लागली होती.
जखमी झालेल्या दीपक ने सांगितले की दोघांनी कात्रज घाटात घेऊन जाऊन माझ्याकडून जबरदस्तीने पैसे घेऊन गोळीबार केला. परंतु, कात्रज घाटात पोलिसांना पिस्तुलाव्यतिरिक्त काही आढळले नाही. त्याने सांगितल्याप्रमाणे काही जुळून येत नव्हते. तेव्हा दीपक याला पोलिसांनी पुन्हा विश्वासात घेऊन विचारले. तेव्हा त्याने खरा प्रकार सांगितले. आपल्याला कर्ज झाल्याने आत्महत्या करण्यासाठी आपण स्वत:च गोळी झाडून घेतल्याचे सांगितले. भारती विद्यापीठ पोलीस अधिक तपास करीत आहेत.
