महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड याने अखेर सीआयडी कार्यालयात शरणागती पत्करली. दोषी असल्यास शिक्षा भोगायला तयार असल्याचे त्याने व्हिडिओद्वारे जाहीर केले.
संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपी वाल्मिक कराड अनेक दिवस फरार होता. पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवूनही तो सापडत नव्हता. अखेर, आज सकाळी त्याने पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरणागती पत्करली.
शरण जाण्यापूर्वी त्याने व्हिडिओद्वारे आपले म्हणणे मांडले आहे.मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील आरोपींच्या शोधासाठी सीआयडीने मोठी मोहीम हाती घेतली होती. ९ पथकांसह दीडशेहून अधिक पोलीस या प्रकरणातील आरोपींचा शोध घेत होते.
मात्र, कोणताही आरोपी पोलिसांच्या हाती लागत नव्हता. वाल्मिक कराड याने दोन दिवसांपूर्वी पुण्यात शरण आल्याची अफवा पसरली होती, मात्र ती खोटी ठरली. अखेर, आज सकाळी स्कॉर्पिओ गाडीतून तो पुण्यातील सीआयडी कार्यालयात पोहोचला.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर आत नेले. त्यावेळी प्रसारमाध्यमांचे मोठे जमाव त्याच्या अवतीभवती होता, परंतु कराडने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.शरणागती पत्करण्यापूर्वी कराडने एक व्हिडिओ जारी केला.
या व्हिडिओमध्ये त्याने केज पोलीस ठाण्यात खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाल्याचा आरोप केला आहे. त्याने म्हटले, “मी पुण्यातील पाषाण रोडवरील सीआयडी कार्यालयात सरेंडर होत आहे. संतोष देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व कठोर शिक्षा द्यावी.
मात्र, राजकीय द्वेषातून माझे नाव या प्रकरणात जोडले जात आहे. जर तपासात मी दोषी आढळलो, तर न्यायालय जी शिक्षा ठोठावेल, ती भोगायला तयार आहे.” सध्या कराडला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सीआयडीकडून सुरू आहे.
