जीएसटी कार्यालयाकडून दोघांवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : बनावट जीएसटी फर्म, बँक खाते, सिमकार्ड, आधार कार्ड आणि पॅन कार्डचा वापर करून तब्बल ४९६ कोटी २७ लाख रुपयांचा कर चुकवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पुण्यातील कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डीजीजीआय (डायरेक्टरेट जनरल ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स इंटेलिजन्स), पुणे विभागाचे वरिष्ठ सूचना अधिकारी अनुराग श्रीवास्तव यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दिनेशकुमार (वय २६, रा. देवडा, जालोर, राजस्थान) आणि विरेंद्रकुमार (वय २६, रा. दिपानियो की ढानी, मुर्तला गाला, बाडमेर, राजस्थान) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार डिसेंबर २०२० ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत घडल्याचे समोर आले आहे. बनावट फर्म कशा प्रकारे वापरल्या? जीएसटी कर चुकविण्यासाठी अनेक व्हाईट कॉलर गुन्हेगार बनावट फर्म तयार करून त्यांचे बँक खाते, सिमकार्ड, आधार कार्ड आणि पॅन कार्ड बनवतात.
या फर्मद्वारे खोट्या बिले तयार करून दुसऱ्या फर्मच्या माध्यमातून जीएसटी परतावा (रिबेट) मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. याच पद्धतीने आरोपींनी शासनाची फसवणूक केली आहे. दिनेशकुमारने बनावट जीएसटी फर्म, बँक खाते, सिमकार्ड, आधारकार्ड आणि पॅन कार्डच्या साहाय्याने चार बनावट फर्म तयार केल्या.
या फर्मद्वारे खोट्या व्यवहारांचे बिले दाखवून त्याने १७२ कोटी ७८ लाख रुपयांचा कर चुकविला आहे. विरेंद्रकुमारने दिनेशकुमारच्या चार फर्मसह एकूण ५४ बनावट फर्म तयार केल्या. या फर्मद्वारे खोटे व्यवहार दाखवून एकूण ४९६ कोटी २७ लाख रुपयांचा कर चुकवून शासनाची मोठी फसवणूक केली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला करत आहेत. पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून सखोल तपास सुरू केला आहे.
