सिंहगड रोड पोलिसांची कामगिरी, तडीपार असतानाही शहरात मुक्काम
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : तडीपार असतानाही शहरात येऊन राहणार्या आणि पिस्तुल बाळगणार्या अट्टल गुन्हेगाराकडून सिंहगड रोड पोलिसांनी दोन पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. बाळू धोंडिबा ढेबे (वय २७, रा. राम मंदिराजवळ, जनता वसाहत) असे या तडीपार गुंडाचे नाव आहे. बाळू ढेबे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्या गुन्हेगारी कृत्यांना आळा बसत नसल्याने पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी ऑक्टोबर २०२४ मध्ये त्याला तडीपार केले होते. तरीसुद्धा तो शहरात येऊन राहत होता.
सिंहगड पोलीस ठाण्याचे तपास पथक १६ जानेवारी रोजी गस्त घालत असताना पोलीस अंमलदार आण्णा केकाण, राहुल ओलेकर आणि विनायक मोहिते यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, तडीपार गुंड बाळू ढेबे हा स्वामी नारायण मंदिर परिसरातील व्हिजन स्कूलच्या पाठीमागील रस्त्यावर थांबला असून त्याच्याकडे पिस्तुल आहे.
ही माहिती खात्रीशीर असल्याचे पाहून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना पाहून बाळू ढेबे पळू लागला. काही अंतर पाठलाग केल्यानंतर त्याला पकडण्यात आले.
झडती घेतली असता त्याच्याकडे ८० हजार रुपयांचे दोन गावठी पिस्तुल आणि २ हजार रुपयांच्या दोन जिवंत काडतुसे सापडली. पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर करत आहेत.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त अजय परमार, सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप दाईगडे आणि गुन्हे निरीक्षक उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम, पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, आबा उत्तेकर, संजय शिंदे, उत्तम तारू, आण्णा केकाण, अमोल पाटील, विनायक मोहिते, शिवाजी क्षीरसागर, राहुल ओलेकर, देवा चव्हाण, सागर शेडगे, विकास पांडुळे, विकास बांदल आणि स्वप्निल मगर यांच्या पथकाने केली आहे.














