जुन्या गाड्यांची बनावट कागदपत्रे तयार करून घेतले कर्ज : एजंट पती-पत्नीवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : जुन्या गाड्यांच्या खरेदी-विक्रीसाठी फायनान्स पुरविणाऱ्या कंपनीला एजंट व्यवसाय मिळवून देत होता. मात्र, खऱ्या कर्ज प्रकरणांमध्ये बनावट कागदपत्रे तयार करून ती कर्जे मंजूर करून घेत एजंट पती-पत्नीने फायनान्स कंपनीची ५२ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केली.
याबाबत सतीश किसनराव कोळी (वय ४४, रा. लक्ष्मी व्हाईट, नऱ्हे) यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अंबादास भाऊराव मडके आणि त्याची पत्नी अश्विनी अशोक लोहकरे (दोघे रा. खडकवासला) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ५ जुलै २०२२ रोजी घडला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सतीश कोळी हे दुगर फायनान्समध्ये शाखा प्रमुख आहेत. दुगर फायनान्स ही जुनी वाहने खरेदीसाठी कर्ज पुरवठा करणारी कंपनी असून तिची मार्केटयार्ड येथे शाखा आहे.
अंबादास मडके हा २०१९ पासून त्यांच्या कार्यालयात कर्ज प्रकरणांच्या फाईली घेऊन येत होता. त्याने कंपनीकडून आतापर्यंत साधारण ६० ते ७० कर्ज प्रकरणे केली असल्याने त्याच्यावर विश्वास निर्माण झाला होता.
त्याने ५ जुलै २०२२ रोजी फिर्यादींना खराडी येथील दरबार हॉटेलमध्ये बोलावून घेतले. हॉटेलमध्ये गाडीच्या व्यवहाराबाबत व कर्जविषयक चर्चा करून कागदपत्रे दिल्यानंतर फिर्यादी कर्ज मंजूर करण्यास तयार झाले.
मडके हा एजंट म्हणून जुन्या गाड्यांची खरेदी-विक्री करताना फायनान्स कंपनीला व्यवसाय मिळवून देत होता. त्याच्यावर विश्वास असल्याने त्याची कर्ज प्रकरणे मंजूर होत होती. या विश्वासाचा गैरफायदा घेत त्याने काही खरी प्रकरणे करताना त्यात बनावट कागदपत्रे जोडून अतिरिक्त कर्जप्रकरणे सादर केली आणि ती मंजूर करून घेतली.
फिर्यादींना जुन्या गाड्या दाखवून तो कर्ज मंजूर करून घेत असे. अशा प्रकारे १२ प्रकरणांमध्ये बनावट कागदपत्रे सादर करून त्याने ५२ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक म्हेत्रे करीत आहेत.















